सुमारे छत्तीस वर्षांपूर्वी मी एमएसडब्ल्यूच्या वर्गात शिकत होतो. महाराष्ट्राबाहेरच्या विविध राज्यांमधून आलेले अनेक विद्यार्थी माझ्या वर्गात शिकत होते. वयाने आमच्यापेक्षा थोडा मोठा असणारा आंध्र प्रदेशातून आलेला एक मुलगा त्यात होता. त्याला समाजकार्याचा पूर्वानुभव असल्याने वर्गात शिकवणार्या सर्वच शिक्षकांना तो अनेक प्रश्न विचारत असे.
त्याच्या त्या सवयीमुळे इतर विद्यार्थ्यांना आणि कधीकधी शिक्षकांनाही कंटाळा यायचा. त्यामुळे सतत प्रश्न विचारणार्या त्या विद्यार्थ्याला कधीकधी रोखलं जायचं. त्याला अशा रितीनं रोखणं योग्य नाही, हे त्यावेळी कळत नव्हतं. शिक्षण संपवून बाहेरच्या दुनियादारीत जगताना प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे हे अधिक चांगल्या प्रकारे कळून आलं. सफरचंद झाडावरून खाली का पडलं? असा प्रश्न झाडाखाली बसलेल्या न्यूटनला पडला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरातून समस्त मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असलेला गुरुत्वाकर्षण हा घटक जगाला ठाऊक झाला. स्वतः पाण्याच्या टबात बसल्यावर त्यातलं पाणी बाहेर का सांडलं? असा प्रश्न आर्किमिडीजला पडला. त्या प्रश्नाच्या उत्तरातून आर्किमिडीजला विस्थापना सिद्धांताचा शोध लागला.
दिवस आणि रात्र का होतात? असा प्रश्न गॅलिलिओला पडल्यावर त्यांनी सूर्य, चंद्र आणि पृथ्वीबाबतचे महत्त्वाचे संशोधन केले. त्यातून तत्कालीन समाजातले लाखो वर्षांपूर्वीचे समज खोटे ठरविणारे विविध निष्कर्ष समोर आले. न्यूटन, आर्किमिडीज, गॅलिलिओ यांसारख्या शेकडो व्यक्तींना त्या-त्या वेळी असे वेगवेगळे प्रश्न पडले. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कष्ट घेतले. त्यातून अनेक नव्या गोष्टींचा शोध लागला. या शोधांमुळे मानवी जीवनात मोठी वैज्ञानिक प्रगती झाली. मानवी जीवन प्रचंड गतिशील झाले. मानववंशशास्त्राचा इतिहास असं सांगतो की, जंगली जनावरांच्या सहवासात राहताना त्या जनावरांसारखंच चार पायांवर चालणार्या आदिम माणसाला एक दिवस असा प्रश्न पडला की, आपण दोन पायांवर उभे राहिलो तर काय होईल?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून माणूस त्याक्षणी आपल्या दोन पायांवर उभा राहिला. आपल्या भूक आणि संरक्षण या दोन्ही मूलभूत गरजांची पूर्ती करण्यासाठी हे दोन पायांवर उभं राहाणं खूप फायदेशीर ठरतंय हे त्याच्या लक्षात आलं आणि तिथूनच माणसाचं संपूर्ण जगणं आमूलाग्रपणे बदललं. आपल्याला विकासाच्या वाटेवर गतिशील राहायचं असेल तर आपल्याला सर्वांनाच सतत प्रश्न पडायला हवेत. प्रत्येक माणसाला प्रश्न पडले पाहिजेत आणि पडलेले प्रश्न त्याने योग्य ठिकाणी विचारले पाहिजेत. ज्ञानार्जन करू पाहणार्या प्रत्येकाला प्रश्न पडत असतात. चौकस आणि चिकित्सक लोकांना सतत प्रश्न पडत असतात. माहिती, ज्ञान व अनुभव मिळवणे हा या प्रश्नांचा हेतू असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक, प्रशिक्षक व मार्गदर्शकांना अधिकाधिक प्रश्न विचारले पाहिजेत. तसेच राज्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यासारख्या समाजहितासाठी उत्तरदायी असणार्या जबाबदार व्यक्ती व संस्थांना नागरिकांनी आपले प्रश्न विचारले पाहिजेत.
अर्थात, जगभरातल्या कोणत्याही सत्तेला नागरिकांनीच काय कुणीही प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. सत्तेला प्रश्न विचारू नयेत याचा कडेकोट बंदोबस्त सत्ताधारी आपापल्या परीने करीत असतात. असं असलं तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेला सतत प्रश्न विचारले जाणं अतिशय आवश्यक असतं. तशी घटनात्मक व कायदेशीर व्यवस्था लोकशाहीत विविध स्तरांवर उपलब्ध असते. त्याचा लाभ आपण आवर्जून घेतला पाहिजे.
लोकलज्जा, न्यूनगंड किंवा भिडस्त स्वभावामुळे अनेकदा माणसं त्यांना पडलेले प्रश्न कुणालाही विचारत नाहीत. त्यामुळे त्यांचंच नुकसान होत असतं. प्रश्न म्हणजे दरवेळी अडचण किंवा समस्या नसते. आपल्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण व्हावं, आपल्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी, आपल्या विचारांना आणि प्रयत्नांना पुरेशी धार यावी यासाठी प्रश्न विचारणं आवश्यक असतं. हे आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला पडणारे प्रश्न विचारताना लोकलज्जा, न्यूनगंड किंवा भिडस्त स्वभावाचा अडथळा सहजपणे पार करता येतो. अलीकडच्या काळात समोरच्याला अडचणीत आणण्याच्या हेतूने प्रश्न विचारण्याचा नवा फंडा निर्माण झाला आहे. इतरांना ब्लॅकमेल करून स्वतःचं पोट भरता यावं असा सवंग हेतू त्यामागे दडलेला असतो. अशा प्रकारे प्रश्न विचारणं सार्वजनिक हिताचं नसतं हेही आपण ध्यानात घ्यायला हवं. वास्तविक कोणताही प्रश्न हा उत्तराकडे जाण्याचा मार्ग दाखवित असतो. प्रश्न जितका स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ असेल तितका उत्तराचा मार्ग सोपा होतो. अर्थात प्रश्न विचारताना तो योग्य वेळी व योग्य ठिकाणीच विचारला जायला हवा. त्यातुन योग्य उत्तर मिळण्याची शक्यता वाढते. अवेळी आणि अनाठायी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. उलट अशावेळी प्रश्न प्रयत्नपूर्वक दडपून टाकले जाण्याची शक्यता अधिक असते. विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून मिळणारी माहिती आणि तथ्ये आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवतात.
या उत्तरांमुळे आपले अज्ञान, अंधश्रद्धा, पूर्वग्रह, गैरसमज इ. गोष्टी दूर करणे शक्य होते. अनेक नवे शोध लागतात. नव्या तंत्रज्ञानाचा जन्म होतो. नवी कौशल्ये आत्मसात करणे शक्य होते. तत्त्वज्ञानाची विविध अंगे समजून घेता येतात. या सगळ्या बाबींचा योग्य वापर करून आपण आपलं जगणं सुसह्य, सुखकर आणि आनंदीही बनवू शकतो. प्रश्न पडणं आणि ते विचारले जाणं हे जसं जिवंतपणाचं लक्षण आहे तसंच प्रश्न न पडणं किंवा पडलेले प्रश्न न विचारणं हे मृतावस्थेचं लक्षण आहे. म्हणून आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि आपण ते योग्य वेळी योग्य ठिकाणी विचारलेही पाहिजेत.
Questions should be asked and they should be asked!