खरातने जमवली कोट्यवधींची माया!

कुणाची छत्रछाया!

नाशिक : प्रतिनिधी
बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कॅप्टन अशोक खरात याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. अंकशास्त्राचा गाढा अभ्यासक म्हणून स्वत:ला म्हणवून घेणार्‍या अशोक खरातच्या मागे एवढी माया जमविण्यासाठी नेमकी कुणाची छत्रछाया होती, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राजकीय नेते, सेलिब्रेटींचा हायप्रोफाइल बाबा म्हणून कॅप्टन अशोक खरात हा प्रसिद्ध होता. शरणपूर येथील एका इमारतीत त्याचे हे भोंदूगिरीचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. बडे बडे राजकीय नेतेमंडळी त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असत. मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिर उभारल्यानंतर तेथेच आलिशान फार्महाऊसही उभारला. विशेष म्हणजे, ज्या मिरगाव शिवारात या अशोक खरातचे फार्महाऊस आहे, त्या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नाही. विशेष म्हणजे, स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी या गावात अजून एसटी बसही जात नाही. मात्र, अशोक खरातने स्वत:च्या फायद्यासाठी बांधलेल्या मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविलेले आहेत. या ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात कुटियादेखील बनविण्यात आलेली आहे. तेथे अनेक राजकीय मंडळींचा नेहमीच राबता होता.

आलिशान बंगला ते जमीन डोळे दीपवणारी संपत्ती

पाथर्डी येथील विविध सर्व्हे क्रमांकांमध्ये सुमारे 30 एकर जमीन असून, तिची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये आहे. तसेच गौळाणे शिवारात कुटुंबीयांच्या नावे सुमारे 30 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यात आल्याचे समजते. मिरगाव व कहांडळवाडी परिसरात 45 एकर जमीन असून, तिची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये असल्याची माहिती आहे. मिरगाव येथील भव्य फार्महाऊसची किंमत सुमारे 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ओझर विमानतळाजवळील जमीन, कर्मयोगीनगर येथील आलिशान बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय यांचा समावेश असून, एकूण मालमत्ता सुमारे 200 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, पोलीस तपास सुरू आहे.

58 व्हिडिओंमध्ये बाबाचे कांड
गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली होती. कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली असून, या डिजिटल पुराव्यांमुळे तपास अधिकच गंभीर
झाला आहे.

मोठे खुलासे होण्याची शक्यता
धार्मिक आस्था आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार केल्याच्या आरोपांसोबतच ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचे गंभीर आरोप समोर आल्याने या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसआयटीमार्फत होणार्‍या सखोल तपासामुळे आणखी पीडित पुढे येण्याची आणि अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिरगावचे मंदिर आले चर्चेत

कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर चर्चेत आले आहे. 16 ऑगस्ट 2010 रोजी मंदिराची स्थापना केली होती. याच मंदिराच्या विश्वस्तपदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशान्येश्वर महादेव मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिर आणि अशोक खरात दोघेही चर्चेत आले. ईशान्येश्वर मंदिराजवळच अशोक खरातचे आलिशान फार्महाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी अशोक खरात येत असे. त्याचबरोबर कोणी सेलिब्रिटी, व्हीआयपी आलेत तर त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये मीटिंग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे.

Kharat has amassed millions of rupees!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *