सप्तशृंगगडावरील घाटरस्त्यांच्या दरडींना मिळणार संरक्षक जाळीचे कवच

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नाशिक जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी पुढच्या काही दिवसांत बरसणार आहेत. पावसाच्या दिवसांत रस्तेमार्गाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. विशेषत: घाटातून जाणार्‍या रस्त्यांवरील वाहतुकीला फटका बसतो. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तशृंगगडावर जाणार्‍या रस्त्यांवर दरडीचे दगड व माती कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाळ्या बसवल्या जाणार आहेत. यामुळे पावसाळ्यात घाटातील रस्त्यांवर पडणारी माती व दगडांपासून वाहनधारकांचे संरक्षण होणार आहे. दरम्यान, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य शासनाकडे पाच कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
वणी येथील सप्तशृंगगडावर श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. धार्मिकदृष्ट्या सप्तशृंगगडाचे मोठे महत्त्व आहे. कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, आंबेजोगाई येथील शक्तिपीठांना ज्याप्रमाणे स्थान आहे, त्याप्रकारे सप्तशृंगगडाचे महत्त्व आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव या काळात मोठी गर्दी असते. नांदुरी गावापासून घाट रस्त्याला सुरुवात होऊन थेट गडापर्यंतचा रस्ता हा घाटाचा आहे. पावसाळ्याच्या दिवसांत घाटाची माती, दगड वाहतुकीच्या रस्त्यावर पडण्याची भीती असते. यापूर्वी पावसाळ्यात कसारा घाटात दरड कोसळून याचा मोठा रेल्वेसेवेला फटका बसला आहे. सप्तशृंगगडावर जाताना-येताना अशा घटना घडू नये, याकरिता रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या घाटाला मजबूत जाळ्या लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विचाराधीन आहे. सरसकट जाळ्या लावण्यासाठी मोठा खर्च असल्याने जेथे आवश्यकता आहे तेथे संरक्षक जाळ्या लावल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने नवरात्रोत्सव काळात व इतर वेळी परिस्थिती पाहून प्रशासनाकडून गडावर खासगी वाहनांना प्रतिबंध केला जातो. संरक्षक जाळी बसवण्याच्या बांधकाम विभागाच्या निर्णयामुळे वाहनधारकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *