नाकाबंदीत दोन टेम्पो, ट्रकसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई करत दोन मालवाहू टेम्पो आणि एका ट्रकसह एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (दि. 4) पिंपळगाव, चांदवड आणि मालेगाव मार्गावर विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील दहीवाळ व दरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने वाहन (एमएच 43 ई 6874, एमएच 16 एम 3971 आणि एमएच 15 डीके 1881) अशी दोन मालवाहू टेम्पो व एक ट्रक जप्त केला. या वाहनांची किंमत सुमारे 25 लाख रुपये असून, त्यामधील 45 घनमीटर जळाऊ लाकडाची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. जप्त केलेला मुद्देमाल मालेगाव वनविभागाच्या लोणवाडे वन पर्यटन केंद्रात ठेवण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागाचे वनक्षेत्रपाल वैभव हिरे, योगीराज निकम, उस्मान सय्यद, हर्षल कोमटे आणि व्यंकट केंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे लाकूड वाहतूकदारांमध्ये खळबळ
उडाली आहे.

Goods worth ₹29 lakh, including two tempos and a truck, seized during a roadblock

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *