सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर येथे ’जय जगन्नाथ’च्या जयघोषात श्री जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर पारंपरिक पद्धतीने भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा सलग दहाव्या वर्षी मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली.
गुरुवारठ (दि. 16) दुपारी चार वाजता सराफनगर येथील जगन्नाथ मंदिरातून कलिंगा सांस्कृतिक व सामाजिक संस्थेतर्फे पारंपरिक वाद्यांच्या गजरात पूजा, पाठ व आरती करून रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
ही रथयात्रा सराफनगर मंदिरापासून प्रारंभ होऊन जायभावे मळा, आदित्य लॉन्स, सिमेन्स कॉलनीमागून मातोश्री चौक, जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन, कलानगर चौक, रथचक्र चौक, बापू बंगलामार्गे मोदकेश्वर मंदिर अशा प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे सरकली. रथयात्रेदरम्यान भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सडा-संमार्जन केले, रस्ते स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढल्या आणि रथावर फुलांची पुष्पवृष्टी करून भगवान श्री जगन्नाथांचे स्वागत केले. या भव्य-दिव्य रथयात्रेत कलिंगा मंडळाचे स्वयंसेवक व पदाधिकारी, नाशिकचे ढोल पथक तसेच जगन्नाथपुरी येथील पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘जय जगन्नाथ’चा जयघोष करत सहभागी झाले. भाविकांना प्रसादाचे वितरणही करण्यात आले. रथ ओढण्यासाठी पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा मोदकेश्वर मंदिरात, म्हणजेच ‘मावशींच्या घरी’ सतरा दिवस मुक्काम राहणार आहे.
रथयात्रा यशस्वी करण्यासाठी कलिंगा समाज कमिटीचे अध्यक्ष देवीप्रसाद पात्र, उपाध्यक्ष उमेशचंद्र राऊत, सचिव सौम्यकांत साहू, कॅप्टन रत्नाकर बारीक, देवानंद बिरारी, राजीव सामंतराय, शिशिर साहू, रंजन जेना, रंजन पटनायक, बी. के. दास, अमिताभ रथ, रिंटू पात्र, विश्वजित साहू आदी पदाधिकारी, संयोजक आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.
Grand Rath Yatra of Lord Jagannath celebrated with enthusiasm in Indiranagar.