प्रशिक्षित मनुष्यबळ; स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी
कुंभ स्किलिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये
♦ 4,300 स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण.
♦ पर्यटन, आरोग्य, आदरातिथ्य व पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर.
♦ अल्पकालीन प्रशिक्षण, अपस्किलिंग आणि आरपीएलचा समावेश.
♦ रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींना चालना.
♦ कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती.
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस)ने कुंभ स्किलिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत 4 हजार 300 स्थानिक युवकांना विविध क्षेत्रांतील कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पामध्ये अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण, विद्यमान कौशल्यांचे उन्नयन (अपस्किलिंग), उद्योजकता विकास तसेच रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (आरपीएल) या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुंभमेळ्याशी संबंधित पर्यटन, आदरातिथ्य सेवा, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
प्रशिक्षणामध्ये पर्यटन मार्गदर्शक, गेस्ट सर्व्हिस असोसिएट, होमस्टे व्यवस्थापन, प्रथमोपचार व आपत्कालीन प्रतिसाद, शेफ, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, जनरल ड्युटी असिस्टंट (आरोग्य सेवा), इलेक्ट्रिशियन तसेच अनुभवी कामगारांसाठी आरपीएल प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रकल्पासाठीचे लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) प्रदान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाची अंमलबजावणी सह्याद्री फार्म्स-टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सह्याद्री फार्म्सचे सुरेश नखाते, तर टाटा स्ट्राइव्हचे संतोष डोंगरे आणि गौरव गुप्ता यांनी लेटर ऑफ इंटेंट स्वीकारले.
यावेळी डॉ. अमित सैनी यांनी जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करणे ही कौशल्य विकास विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि भाविकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Skill training for 4,300 youths for the Kumbh Mela