21 मार्च हा दिवस जगभरात जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. मानवाला निसर्गाने अनेक अमूल्य देणग्या दिल्या आहेत. शुद्ध हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सागरी संपत्ती यांसोबतच वनसंपत्ती हीदेखील अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. वन हे पर्यावरणाचा समतोल राखणारे, जीवनाला आधार देणारे आणि पृथ्वीला समृद्ध करणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे वनांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा करून जनजागृती केली जाते.
वनांचे महत्त्व
आज जगाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त भूभागावर जंगले पसरलेली आहेत. या जंगलांत 60 हजारांहून अधिक वृक्षप्रजाती आढळतात. अनेक प्रजाती अद्याप मानवाला पूर्णपणे ज्ञात नाहीत. प्रगत राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांचा मोठा वाटा आहे. इतिहासात मेसोपोटेमिया, सीरिया आणि पॅलेस्टाइन यांसारखे प्रदेश एकेकाळी समृद्ध होते; परंतु जंगलांचा र्हास झाल्यानंतर ते प्रदेश हळूहळू उजाड झाले.
वन पृथ्वीच्या पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हरितगृह वायूंना शोषून घेणे, जागतिक तापमानवाढ नियंत्रणात ठेवणे आणि हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य वनांमुळे होते. तसेच जमिनीची धूप रोखण्याचे कामही वने करतात. जमिनीचा फक्त एक इंच सुपीक थर तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात; परंतु जंगलांचा अभाव असल्यास एका पावसाळ्यातच हा थर वाहून जाऊ शकतो.
जैवविविधतेचे रक्षण
वनांमध्ये असंख्य प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचे जीवन नांदते. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी वनांचा मोठा हातभार लागतो. हवामान बदलांशी जुळवून घेण्यातही वन परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. वनांमधून मानवाला अनेक प्रकारच्या वस्तू मिळतात. लाकूड, अन्नधान्य, रानमेवा, फळे, फुले, औषधी वनस्पती, चंदनासारख्या मौल्यवान वस्तू, तसेच विविध प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती वनातून मिळते. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी वनांचे महत्त्व विशेष आहे.
वन दिनाची पाश्वर्र्भूमी
संशोधनानुसार दरवर्षी जगात 13 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जंगलांचा नाश होत आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 28 नोव्हेंबर 2012 रोजी जागतिक वन दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचा उद्देश म्हणजे जंगलांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, वनसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जंगलांवर अवलंबून असलेल्या आदिवासी व इतर समाजघटकांच्या जीवनाकडे लक्ष वेधणे. जागतिक अन्न व कृषी संघटनेचाही या उपक्रमात मोलाचा वाटा आहे. संयुक्त राष्ट्रांनी या दिनासाठी शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर हे घोषवाक्य दिले आहे.
भारतातील वनसंपदा
पर्यावरण आणि वन मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारत वनस्थिती अहवाल 2021 नुसार भारताचे एकूण वनक्षेत्र 7,13,789 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.72 टक्के इतके आहे.
2019 च्या अहवालाच्या तुलनेत देशातील वनक्षेत्रात 1540 चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे, तर वृक्षाच्छादित क्षेत्र 721 चौरस किलोमीटरने वाढले आहे. महाराष्ट्रातही मोठी वनसंपदा आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 50,798 चौरस किलोमीटर क्षेत्रावर वने आढळतात. वन हे पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाते. ते केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाहीत, तर मानवाच्या जीवनाला आधार देतात.
त्यामुळे जंगलतोड थांबवणे, वृक्षलागवड करणे आणि वनांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जागतिक वन दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश देणारा दिवस आहे.
Green, green, cool carpet: World Forest Day
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…