मखमलाबाद शिवारातील ग्रीनफिल्ड टीपी स्कीम अखेर रद्द

नाशिक : प्रतिनिधी
मखमलाबाद शिवारातील 753 एकर क्षेत्रावर हरित विकास क्षेत्रांतर्गत प्रस्तावित केलेली नगररचना योजना रद्द करण्याचे अधिकृत आदेश महापालिका प्रशासनाने काढले. ही योजना रद्द व्हावी याकरिता आ. देवयानी फरांदे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मागणी केली होती. त्यानुसार अनेक वर्षांपासून आ. फरांदे यांनी प्रयत्न करून अखेर ही योजना रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला.
मखमलाबाद व हनुमानवाडी शिवारातील 753 एकर जागा नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीमार्फत 2019 मध्ये हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती या योजनेला प्रस्तावित क्षेत्रातील शंभर टक्के शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला होता. योजना रद्द करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांच्याकडेही शेतकर्‍यांनी सातत्याने मागणी केली. त्यानुसार आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सातत्याने पाठपुरावा केला, तसेच नगरविकास सचिवांकडे बैठकदेखील घेण्यात आली होती. त्यानंतर ही योजना मागे घेण्याविषयी शिफारस करणारा ठराव महासभेने 20 नोव्हेंबर 2020 रोजी मंजूर केला होता.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी कंपनीला 1 एप्रिल 2022 नंतर कोणत्याही नवीन कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येऊ नये, असे कळवले होते. अशा परिस्थितीत प्रस्तावित हरित क्षेत्र विकास योजना राबवता येणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने 14 डिसेंबर 2020 रोजी शासनाला पत्र पाठवत सदर योजनेची अंमलबजावणी करता येणार असल्याचे कळवले.
या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रश्नी विशेष पाठपुरावा करत शासनस्तरावर विविध बैठका घेतल्या. यामुळे या भागातील विकास रखडल्याची बाबही त्यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
अखेर आमदार प्रा. फरांदे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत प्रस्तावित मखमलाबाद नगररचना योजना अधिकृतपणे रद्द करण्याचा ठराव पारित केला. तसा आदेशही मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी काढले. या निर्णयामुळे स्थानिक जमीनधारक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Greenfield TP scheme in the Makhmalabad area finally cancelled.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *