ट्रॅफिक जामचा सुपर संडे

गंगापूररोडला वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा
नाशिक : प्रतिनिधी
पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या कामाचा वाहतुकीला मोठा फटका बसत असल्याने नाशिककरांना दररोज या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. काल पाऊस उघडल्यामुळे रविवारची सुट्टी कुटुंबासोबत साजरी करण्यासाठी गंगापूर रोड, बॅक वॉटरकडे जाणार्‍या नाशिककरांना तीव्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. गंगापूररोडवर तब्बल तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल दुपारनंतर उघडीप दिली. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककर घराबाहेर पडले. गंगापूर धरण, बॅक वॉटर, गिरणारे रोड, सुला वाइन या भागातील निसर्गरम्य वातावरणात वीकेंड साठी जाणार्‍या वाहनधारकांना गंगापूर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. आनंदवल्ली ते बेंडकुळे नगरपर्यंत दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने या कोंडीचा फटका दररोज जा-ये करणार्‍या वाहनधारक, चाकरमान्यांना बसत आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रिक्षाचालक, दुचाकीस्वार यांच्याकडून घुसखोरी होते. त्यामुळे एका लाइनीत चालणार्‍या वाहनांना याचा फटका बसून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काल रविवार असल्यामुळे गंगापूररोडवर वाहनांची मोठी गर्दी होती. वीकेंडमुळे पावसाळी पर्यटनाला जाणार्‍या वाहनधारकांमुळे लांबच लांब लागलेल्या रांगामुळे वाहतूक पोलिसांची देखील मोठी दमछाक झाली. आनंदवल्ली सिग्नल येथे तीन तीन पोलिस असूनही वाहतुकीचे नियमन करणे काल अवघड झाले होते. बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र काल या भागात पाहावयास मिळाले.

हॉटेल्सची पार्किंग रस्त्यावर

बारदान फाट्याजवळ असलेल्या मिसळ पाँईटमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. दूर दूर अंतरावरुन येणार्‍या ग्राहकांची वाहने थेट रस्त्याच्या कडेला लावली जातात. त्यामुळे बारदान फाटा येथे वाहनांची मोठी गर्दी होत आहे. संबधित हॉटेल चालकाचे स्वत:चे पार्किंग स्थळ नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणी सिटी लिंक बसेसही उभ्या केल्या जातात. त्यामुळे महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने दर रविवारी या ठिकाणी होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीबाबत तातडीने संबधितांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Traffic Jam Super Sunday

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *