मालेगाव मनपाचा निषेध : रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर खड्ड्यांमध्ये गुढी उभारून आंदोलकांनी मालेगाव महानगरपालिकेचा तीव्र निषेध नोंदवत सटाणा रोडवरील सटाणा नाका परिसरात रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले.
शहरातील शिवतीर्थ, मोसम पूल, जुना आग्रा रोड, कॅम्प रोड, सटाणा रोड, साठ फुटी रोड आदी प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही खड्ड्यांमुळे काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भरत पाटील यांनी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देऊन तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर आंदोलन करण्यात आले.
सटाणा रोडवरील खड्ड्यांमध्ये गुढी उभारून आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी रस्त्यावरील दुर्दशेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले असून, काम पूर्ण होऊनही अनेक महिन्यांपासून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय, अपघातप्रवण ठिकाणी योग्य त्या उपाययोजना न करता मनमानी पद्धतीने स्पीडब्रेकर उभारण्यात आल्याची तक्रारही आंदोलकांनी केली. झेब्रा क्रॉसिंग, पांढरे-पिवळे पट्टे नसल्याने वाहतुकीत गोंधळ निर्माण होत आहे. निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यांमुळे रस्त्यांना तडे जात असून, वरचा थर उखडून खडी बाहेर येत आहे. काही ठिकाणी रस्ते समतल नसल्याने पाणी साचत असून, भुयारी गटारांची झाकणे रस्त्यापेक्षा उंच असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
गेल्या तीन वर्षांत मनपाने कोट्यवधी रुपये खर्च केले असताना, शहराचा दर्जा सुधारला नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, मनपा प्रशासनाच्या वतीने प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांची समजूत काढली व तीन दिवसांत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महानगर अध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष भरत पाटील, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, माजी नगराध्यक्ष दीपक भोसले, डॉ. वीरेंद्र चव्हाण, दिनेश पाटील, अशोक जाधव, किशोर जाधव, दीपक बच्छाव, प्रकाश सावंत, उत्तम कचवे, बारकू शेलार, पप्पू केबलवाले, उद्योजक अमित पाटील, प्रदीप पहाडे, कल्पेश गायकवाड, भैया पाटील, मिलन पटेल, नागेश शिंदे, राजेंद्र गायकवाड, संदीप पाटील, गोपाल सोनवणे, सुरेंद्र आबा पाटील, दीपक जाधव, अंश पाटील, नागेश शिंदे आदी उपस्थित होते.
Gudi erected in pits on the occasion of Gudi Padwa