‘भूमिअभिलेख’ संशयाच्या भोवर्यात
सिडको : विशेष प्रतिनिधी
म्हाडाच्या बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. काही संशयितांची नावे वगळण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून दबाव आणला जात असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना, पोलिसांनी मात्र अशी कोणतीही मागणी स्पष्टपणे नाकारत कठोर भूमिका घेतली आहे.
दरम्यान, ‘सखोल तपास आणि कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय संशयितांचे नाव कमी होणार नाही,’ अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने या घोटाळ्याशी संबंधित रॅकेटचे धाबे
दणाणले आहेत.
तपासादरम्यान समोर आलेली नावे आणि संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी यापूर्वीच करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे एखादे नाव समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी ठराविक नावे वगळण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून होत असलेला वारंवार आग्रह पोलिसांच्या नजरेत संशयास्पद ठरत आहे. या प्रकरणामागे संघटित रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून प्रत्येक तांत्रिक पुराव्याची बारकाईने तपासणी
सुरू आहे. दरम्यान, अटकेच्या भीतीने अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
सोमवारी आणि मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी आणखी सहा संशयितांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. दोन दिवसांपूर्वी अर्ज केलेल्या संशयितांमध्ये जगदीश बलवंत केदार, निर्मला मधुकर वारे, सलिम इब्राहिम कोकणी, नगमा सलिम कोकणी, जगन्नाथ विठ्ठलराव सूर्यवंशी आणि गायत्री जगन्नाथ सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून सर्व संशयितांची नावे तसेच त्यांच्या संबंधित जमीन व्यवहारांची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले असून, जामीन अर्ज फेटाळल्यास मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Investigation into MHADA scam intensifies