आज यलो अलर्ट, पावसामुळे नागरिकांची तारांबळ
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गुरुवारी सायंकाळी तासाभरात झालेल्या पावसामुळे सराफ बाजार, मेन रोड, दहीपूल परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. पावसाने धुवाधार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार सरी गारांसह कोसळल्या.
शहरातील शालिमार, मेनरोड, सीबीएस, पंचवटी, सातपूर, सिडको, अंबड आणि नाशिकरोड परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. याचा वाहतुकीवरदेखील थोड्याफार प्रमाणात परिणाम झाला. पावसामुळे या अर्धवट खोदलेल्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. मुंबई नाका आणि द्वारका या मुख्य चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती, परिणामी कामावरून घरी परतणार्या नोकरदारांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या पावसामुळे तापमानात घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कांदा, गहू या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुढील काही दिवस पावसाच्या अंदाजामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने कांदा आणि गहू या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वार्यासह होणारा पाऊस फळबागांसाठीही घातक ठरू शकतो.
विजेचा लपंडाव
शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर विजेचा लपंडाव सुरू झाला. सतत लाइट येत-जात असल्याने नागरिक हैराण झाले होते.
जिल्ह्याला आज यलो अलर्ट
आयएमडीच्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यावर पुढील तीन दिवस पावसाचे सावट राहणार आहे. शुक्रवारी (दि.3) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 40-50 किमी वेगाच्या वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच रविवार(दि.5)पर्यंत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
रस्त्यावर चिखल
शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध भागांत कामे सुरू आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी गुरुवारी झालेल्या पावसानंतर मातीच्या ढिगार्यातील माती रस्त्यावर वाहून आल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण जात होते.
भाविकांची तारांबळ
हनुमान जयंती असल्याने शहरातील हनुमान मंदिरांमध्ये दुपारी चारनंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकांची मोठी तारांबळ व फजिती उडाली. ठिकठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे सर्व नियोजन कोलमडल्याचे दिसले.
Heavy rain with hail for an hour in Nashik