प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

दिंडोरी : प्रतिनिधी
चिंचखेडच्या युवकाचे खून प्रकरण उलगडण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. या घटनेत पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दारू पिऊन त्रास देतो, वेड्यासारखा वागतो म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा प्रकार दिंडोरी पोलिसांनी उघडकीस आणला असून, दोघा आरोपींना अटक केली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 2 जून रोजी नाशिक ते पेठ रस्त्यालगत देहरेवाडी ते रासेगाव रोडवर पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दिंडोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राप्त धाग्यादोर्‍यांच्या सहाय्याने वेगाने तपास सुरू केला. तपासात मयत इसमाची पत्नी सुनीता अनिल झेंडफळे हिचे दीपक दत्तू गवे, रा. रवळगाव, ता. दिंडोरी, हल्ली मुक्काम पालखेड बंधारा, ता. दिंडोरी या इसमाशी सहा वर्षांपासून अनैतिक संबंध समोर आले.
दीपक गवे याने सुनीताशी संगनमत करून अनिल झेंडफळेच्या खुनाचा कट रचला. प्रेयसी सुनीताकडून पैसे घेत झेंडफळे यास दारू पाजून 2 जूनच्या रात्री देहरेवाडी-खराडी शिवारात देहरेवाडी ते राशेगाव रस्त्याच्या लगत अनिलच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून त्यास दीपक गवे याने ठार मारले अन् मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी मयताच्या पत्नीचे फोनच्या कॉल डिटेल्स
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाची उकल करून आरोपी दीपक गवे यास अटक केली. याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक माधुरी कांगणे यांनी कळवणचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस नाईक धनंजय शीलावटे, बाळा पानसरे, संदीप कडाळे, युवराज खांडवी यांच्या पथकाने संशयित आरोपींना गजाआड केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *