नाशिक : प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापासून नाशिक लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबतची उत्सकता अखेर संपली असून, ही जागा एकनाथ शिंदे गटाकडेच राहिली असून, खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीच्या स्पर्धेत बाजी मारली आहे, एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर सुरू असलेली उमेदवारी कुणाला मिळणार? ही चर्चा अखेर संपली आहे,
नाशिक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी वरून मोठा तिढा निर्माण झाला होता. नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी ची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर भाजपने नाशिकच्या जागेवर दावा केला होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची देखील शिष्टमंडळाने भेट घेतली होती, भाजपकडून दिनकर पाटील, कंठानंद स्वामी, अनिकेत शाश्री यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला होता. तर मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांनी सांगितल्याने भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती, स्वतः भुजबळ यांनी देखील उमेदवारी करणार असल्याचे सांगितले होते, मात्र दिल्लीतील नेत्यांनी सांगून देखील उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवारी च्या स्पर्धेतून भुजबळ यांनी माघार घेतली होती. माघार घेतली तरी उमेदवार अनेक जण असल्याने ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांचेही नाव चर्चेत आले होते, तर हेमंत गोडसे यांच्याबद्दल असलेल्या नकारात्मक सर्वेक्षण मुळे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या देखील नावाची चर्चा झाली, बोरस्ते यांना दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेत चर्चा केली होती, मात्र हेमंत गोडसे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते.
शांतिगिरी महाराज यांनी देखील शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला असून, काल नाशिक मध्ये आलेले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती, त्यांनतर सायंकाळी भुजबळ फार्म वर जात भुजबळ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती.
हॅटट्रिक करणार का?
नाशिक लोकसभा मतदार संघाचे जागेवरून अनेक ट्विस्ट आले, अखेर उमेदवारी च्या स्पर्धेत हेमंत गोडसे यांनी बाजी मारली असल्याने शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत हेमंत गोडसे यांची लढतउद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे, राजाभाऊ वाजे यांना महिन्याभरपूवीच उमेदवारी मिळाल्याने त्यांनी प्रचाराची फेरी देखील पूर्ण केली असून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते,
नाशिकमध्ये सलग खासदार निवडुन येत नाही, परंतु मागील वेळेस गोडसे यांनी सलग विजयी होण्याचा विक्रम केलेला आहे, आता पुन्हा ते हट्रिक करतात का? याचे उत्तर 4 जूनला मिळणार आहे.