फ्रान्समधील परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नीस (फ्रान्स) :
’इनोव्हेशन (नावीन्य) हे भारताच्या डीएनएमध्ये आहे’, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील ’भारत इनोव्हेट्स’ या तंत्रज्ञान परिषदेत केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे संयुक्त उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या बदलत्या भूमिकेवर भर दिला. भारत आता तंत्रज्ञान केवळ ’स्वीकारणारा’ देश राहिला नसून, तो संपूर्ण जगाला शाश्वत तंत्रज्ञान ’पुरवणारा’ देश बनला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय टॅलेंट (कौशल्य) आणि युरोपीय भांडवल तसेच तज्ज्ञता यांच्यातील एक भक्कम दुवा म्हणून हे ’भारत इनोव्हेट्स’ व्यासपीठ काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिमच्या वेगाने होणार्या विस्ताराची आकडेवारी मांडताना मोदी म्हणाले की, भारतात आजघडीला दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून, ते जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहेत. परिषदेत सहभागी झालेल्या 120 भारतीय स्टार्टअप्सचे आणि युवा नवउद्योजकांचे कौतुक करत, भारतीय तरुणांनी जुन्या वाटा सोडून स्वतःचे नवे मार्ग निवडल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. यासोबतच भारताने संरक्षण, अंतराळ आणि आण्विक ऊर्जा यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये वेगाने धोरणात्मक सुधारणा करून ती क्षेत्रे संशोधनासाठी खुली केली असल्याची माहिती पंतप्रधानांनी जागतिक गुंतवणूकदारांना दिली.
याप्रसंगी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताच्या ’मेक-इन-इंडिया’ उपक्रमाचे आणि संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले. ’चांद्रयान-3’ मोहिमेंंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या ऐतिहासिक यशाचा विशेष उल्लेख करत त्यांनी भारताच्या सामर्थ्याला दाद दिली.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध केवळ व्यावसायिक नसून ते समान मूल्ये आणि समान दृष्टिकोनावर आधारित असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), हवामान बदल आणि नागरी अणुऊर्जा (स्मॉल मॉड्युलर रिक्टर्स) यांसारख्या धोरणात्मक व महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.
तत्पूर्वी, फ्रान्समध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आगत्यपूर्वक गळाभेट घेत जोरदार स्वागत केले. या सहा दिवसीय युरोप दौर्यात मोदी 16-17 जून रोजी फ्रान्समधील एवियन येथे आयोजित ’जी-7’ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दौर्याच्या शेवटी, 18 जून रोजी ते ’वीवा टेक 2026’ या तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी पॅरिसला भेट देणार आहेत. या दौर्यात मोदी हे स्लोवाकियालाही भेट देणार आहेत. स्लोवाकियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत.
फ्रान्समध्ये होणार ट्रम्प-मोदी भेट
येत्या आठवड्यात 16 व 17 जून रोजी फ्रान्समधील ’एव्हियन’ येथे होणार्या ’जी-7’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेट होणार आहे. अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी शनिवारी या बहुचर्चित भेटीला अधिकृत दुजोरा दिला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील सध्याचे संबंध, व्यापार आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये होणार्या या थेट भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
Innovation in India’s DNA