चांदवडच्या बाजारवेशीवर 1757 चा इतिहास उजेडात

मल्हारराव होळकरकालीन दुर्मीळ शिलालेख सापडला

चांदवड : वार्ताहर
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदवड शहरातील सोमवार पेठेच्या बाजारवेशीवर 18 व्या शतकातील दुर्मीळ फारसी शिलालेख संशोधनाअंती उजेडात आला आहे. या शिलालेखात मराठा साम्राज्यातील पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर आणि सरदार शाहजी दाभाडे यांच्या नावांची स्पष्ट नोंद आढळली आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज मराठाकालीन सार्वजनिक बांधकामांची साक्ष देतो. मात्र, जाहिरातींच्या बॅनरबाजीमुळे हा ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला असून, त्याच्या तातडीच्या संवर्धनाची मागणी होत आहे.
सोमवार पेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला दगडी चौकटीत उठाव स्वरूपातील तीन ओळींचा हा फारसी शिलालेख कोरलेला आहे. शतकांपासून उघड्यावर असल्याने ऊन-पावसामुळे अक्षरे पुसट झाली होती. इतिहास संशोधक अनिल किसन दुधाणे यांनी कागदी छाप घेऊन त्याचे वाचन पूर्ण केले. शिलालेख वाचक मोहमद तारिक रसूल यांनी या फारसी मजकुराचे वाचन केले. डॉ. शैलेंद्र भांडारे, करण सोनी व अतुल पवार यांचे सहकार्य लाभले.
छत्रपती रामराजे यांच्या कारकिर्दीत, फसली वर्ष 1164 म्हणजेच इसवी सन 1757 मध्ये या वेशीचे
जीर्णोद्धार व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या अधिपत्याखाली हे काम झाले आहे. सरदार शाहजी दाभाडे यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. तत्कालीन मराठा प्रशासनात फसली कालगणना आणि फारसी भाषेचा प्रशासकीय वापर होत असल्याचा हा ठोस पुरावा आहे.

शिलालेखाचा तपशील
स्थळ : सोमवार पेठ (बाजार वेस), चांदवड, जि. नाशिक भाषा व शैली : फारसी (कोरीवकाम) काळ : फसली 1164 (इसवीसन 1757) कारकीर्द: छत्रपती रामराजे
उल्लेखित नावे : सुभेदार मल्हारराव होळकर, शाहजी दाभाडे. संशोधन : अनिल किसन दुधाणे. वाचन: मोहमद तारिक रसूल.

बॅनरबाजीमुळे वास्तू धोक्यात
एकीकडे हा सुवर्णकाळ प्रकाशात आला असला तरी, स्थानिक स्तरावर फलक व व्यावसायिक जाहिरातींसाठी वेशीच्या प्राचीन दगडांमध्ये लोखंडी खिळे ठोकले जात आहेत. यामुळे मूळ दगडांना तडे जात असून शिलालेख आणि वास्तू कमकुवत होत आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागामार्फत या ऐतिहासिक वास्तूचे शास्त्रीय संवर्धन करावे आणि वेशीवर खिळे ठोकण्यास तातडीने प्रतिबंध करावा, अशी मागणी इतिहासप्रेमी करत आहेत.

History from 1757 brought to light at the Chandwad market gateway.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *