सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्त, ठेकेदार मस्त
दिंडोरी ः प्रतिनिधी
लखमापूर फाटा-वरखेडा रस्त्यावर मागील महिन्यात जानोरीच्या युवा नेत्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर जऊळके वणी – खेडगाव रस्त्यावर साइटपट्ट्या नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. गेल्या महिन्यात करंजखेड फाट्यानजीक फरशीवर आदळल्याने एकाचा मृत्यू झाला. या सर्व घटना व अपघात पाहता दिंडोरी तालुक्यात ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष
दिसत आहे.
जनतेच्या हिताची काळजी घेण्यापेक्षा स्वहितात अधिकारी गुंतल्याचे दिसते. राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीचा बांधकाम विभाग कधी जागा होणार? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
दिंडोरी, पेठ तालुक्यांत अनेक ठिकाणी विकासकामांसाठी निधी आलेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. रस्त्याच्या कामाची गती जोरात आहे. कामाची बिलेही झटपट निघाली आहेत; परंतु त्यांच्या दर्जावर व साइटपट्ट्या भरलेल्या नसतानाही बिले निघण्याच्या प्रक्रियेवर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले राजकीय नेते, उमेदवार प्रश्नचिन्ह उपस्थित
करत आहेत.
दिंडोरी तालुक्यात केलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या अर्धा ते एक फूट खोल असलेल्या साइडपट्ट्या संबंधित ठेकेदारांनी भरल्या नसल्याने व काही ठिकाणी अपूर्ण, तसेच काळ्या मातीने भरल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
दिंडोरी तालुक्यात राज्य शासनाच्या जनजाती क्षेत्रांतर्गत, तसेच केंद्रीय रस्ते यांच्या प्रयत्नातून विविध रस्त्यांची कामे केली आहेत. काही कामे झाली आहेत. रस्त्यांचा दर्जा चांगला असावा व दीर्घकाळ सुस्थितीत राहावा, यासाठी सिमेंंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. काही ठिकाणी कामे सुरू, तर काही अपूर्णावस्थेत आहेत. निळवंडी ते पाडे रस्त्यावर अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतच उतार आहे आणि उतारानंतर नदी आहे. काँक्रीट रस्त्यावर साइटपट्ट्या नसल्याने एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. दुसर्या वाहनाला जायला मार्ग नाही. त्यामुळे वाहनचालकांत बाचाबाची होते. अनेक वेळा तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही.
दिंडोरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला आता कात टाकण्याची गरज आहे. उत्तर विभाग असो किंवा पंचायत समिती बांंधकाम विभाग असो, यातील अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर करू नये. जनता शांत वाटत असली तरी तिच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जसजशा दुर्घटना घडतील, तसा जनतेचा उद्रेक वाढणार आहे. जनतेचा उद्रेक वाढून बांधकाम विभागाला टाळे लावण्याअगोदरच अधिकार्यांनी जागे व्हावे.
पूर्वीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण
बोपेगाव ते तळेगाव वणी, अंबानेर फाटा ते राजपाडा, पुणेगाव ते कोशिंबे, राजीवनगर ते रतनगड, ओझरखेड ते करंजी आदी अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र, काँक्रीट रस्ता तयार करताना बहुतांश रस्ते हे पूर्वीच्याच रस्त्यावर सिमेंट काँक्रीट केल्याने ते पूर्वीच्या रस्त्यापासून पाऊण ते एक फुटापेक्षा अधिक उंचीचे झाले आहेत. हे रस्ते 3.75 मीटर (12 फूट) रुंदीचे आहेत. काम घेतलेल्या ठेकेदारांनी रस्ते पूर्ण केले, पण रस्त्याच्या कडेला योग्य अशी साइटपट्टी किंवा हरितपट्टी केलेली नाही. रस्त्यांच्या कामाला चार-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्यांच्या वरच्या थरापासून साइडपट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढविण्यासाठी कसरत करावी लागते.
दुर्घटनेनंतर जाग येणार का?
दिंडोरीत बसस्थानकासमोर मोठा खड्डा पडला असून, येथूनच सांडपाणी वाहते. शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे अनेक वयोवद्ध, तसेच महिला, लहान मुले जातात. येथे आदिवासी विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या या चेंबरमध्ये अनेकदा वाहने अडकली आहेत. पुरेसे पाणी त्यात वाहून जात नाही. जास्त पाऊस झाला तर खड्डा तुंबून त्यात एखादा लहान मुलगा पडला तर दुर्घटना घडू शकते. बांधकाम विभागाला आता जाग येते की दुर्घटना घडल्यानंतर? हे बघावे लागेल.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…