रेल्वेचा प्रवास किती सुरक्षित, किती किफायतशीर?

काही दिवसांपूर्वी मुलुंड स्थानकात वातानुकूलित लोकलची एसी यंत्रणाच बंद पडली. त्यामुळे अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या. नशिबाने केवळ एवढ्यावरच निभावले. त्याअगोदर नागपूर येथील महिला परप्रातांतून देवदर्शन करून परत येत असताना त्यांचे आरक्षण असूनही त्यांना आपली हक्काची जागा मिळाली नाही. उलट त्यांच्याबरोबर गैरवर्तन केले गेले, त्यांच्या मदतीला ना रेल्वे प्रशासन धावून आले ना, आरपीएफ यंत्रणा. मध्यंतरी पश्चिम रेल्वेवर केवळ लोकलचा दरवाजा लावण्याच्या वादातून एकावर चाकूहल्ला आणि त्यात एका युवकाचा बळी गेला होता. दुसर्‍या एका घटनेत एका तरुण प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती. मुंबई परिसरातील आसपासच्या भागातून जवळपास 75-80 लाख लोक दररोज प्रवास करतात. कोणी शिक्षण, व्यवसाय, नोकरी, धंदा करण्यासाठी येतो, तर कोणी वैद्यकीय उपचारासाठी येतो. यामुळेच तर लोकलसेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर याच मुंबईत दररोज येणार्‍या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. मात्र, लोकलसेवा तसेच मेल, एक्स्प्रेस गाड्यांची क्षमता अपुरी पडत आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण पुढील दक्षिण भारत तसेच उत्तर भारतात जाण्यासाठी केवळ दोनच मार्ग आहेत. यामुळे लोकल
फेर्‍या वाढविता येत नसल्याचे रडगाणे नेहमीच गायले जाते. मात्र, त्याच वेळी लांब पल्ल्याच्या अधिकच्या प्रवासी गाड्या मात्र धावतात. प्रवाशांची किमान अपेक्षा सुखकारक, किफायतशीर भाड्यात प्रवास व्हावा. गाड्या वेळेवर चालवाव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे. मात्र, नेमके तेच होत नाही. यामुळे लोकल प्रवास असो की मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास हा कधीच सुखकारक होत नाही. केवळ फर्स्ट क्लास किंवा वरच्या वर्गाचा क्लास सोडून. नित्यनियमाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना एसी भाडे परवडणे शक्यच नाही. त्यातूनही एखाद्या वेळी सामान्य प्रवाासी खर्चिक प्रवास करतो.
2017 पासून अगोदर पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुविधा चालू करण्यात आली. मात्र, ही सेवा सुरू करण्यात आली ती साधारण लोकलच्या फेर्‍या रद्द करून. त्यामुळे साधारण लोकलला गर्दी वाढली आणि सोयीपेक्षा गैरसोय झाली म्हणून प्रवाशांनी आंदोलन केले. कालांतराने एसी लोकल सेवा मध्य, तसेच हार्बर मार्गावर सुरू करण्यात आली. मात्र, हार्बर मार्गावरील सेवा खंडित करण्यात आली आणि एक-दोन वर्षांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेचा विस्तार आता उरणपर्यंत झाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली असून, परिणामी लोकलची गर्दी वाढते आहे. वाढत्या गर्दीची परिणती प्रवाशांमधील भांडणात होत असून, अनेकदा हाणामारी, प्रसंगी हत्या होणे यात होत आहे. लोकल किंवा लांब पल्ल्याच्या प्रवाशांची खरी गरज लक्षात न घेता एसी लोकलचा अट्टाहास धरून प्रवाशांवर महागडा प्रवास लादला जात आहे. त्याचप्रमाणे मेल, एक्स्प्रेसमध्ये अनारक्षित, स्लिपर क्लासचे डबे अधिक असणे गरजेचे असताना त्याऐवजी एसी टू टियर, थ्री टियरचे डबे वाढविले जात आहेत. कधीकधी संपूर्ण एसी ट्रेन धावत आहेत. राजधानी, वंदे भारत यांसारख्या महागड्या गाड्यांचे तिकीट दर परवडण्यासारखे नाहीत. त्यातही प्रिमियम भाडे, तत्काळ बुकिंगच्या नावाखाली प्रवाशांकडून अधिकचे भाडे वसुल केले जाते. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोकणात जातात. मात्र, त्या गाड्यांचे बुकिंग अगदी काही सेकंदातच फुल्ल होते. यावर्षीदेखील असेच झाले. जिथे सामान्य डब्यातील प्रवासी मेंढरासारखे दाटीवाटीने गर्दीतून प्रवास करतात तिथे कधीकधी उच्च वर्गातील डबे पूर्णक्षमतेनेदेखील भरत नाहीत. या सगळ्यात प्रवाशांची गैरसोय तर होतेच, पण आर्थिक लूटदेखील होते. एसी लोकल वाढविण्याची मागणी ना कोणी प्रवासी ना कोणत्या प्रवासी संघटना करताना दिसतात. मात्र तरीदेखील एसी लोकलचा अट्टाहास धरून प्रवाशांवर महागडा प्रवास लादला जात आहे आणि प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. रेल्वे ही सेवा आहे ना की पैसा कमावण्याचा उद्योग. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचे आंशिक खाजगीकरण आणि कंत्राटीकरण होत आहे आणि त्याची किंमत सामान्य प्रवाशांना मोजावी लागते आहे. एसीने प्रवास करणारे जेमतेम 30-40 टक्के प्रवासी असू शकतात. त्यासाठी सामान्य प्रवाशांवर महागडा प्रवास लादणे कितपत योग्य आहे? आजच्या घडीला तर काही रेल्वे या खाजगी कंपन्या, कार्पोरेट सेक्टर यांना चालविण्यास आंदण दिल्या आहेत.
देशभरातील रेल्वे प्रवासी हा सामान्य माणूस आहे. त्याला पंचतारांकित सुविधा नको तर किमान किफायतशीर दरात प्रवास,तसेच सुखकारक प्रवास एवढीच माफक अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासीभिमुख दृष्टिकोनातून आपली जबाबदारी पार पाडायला हवी.

How safe and cost-effective is train travel?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *