मार्केट इकॉनॉमीत डोकाऊ पाहणारा न्यू इव्हेंट

प्रा. कीर्ती वर्मा

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून जे सोळा संस्कार महत्त्वाचे मानले जातात, त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार होय. सध्या भारतीय समाजव्यवस्थेकडून मान्यताप्राप्त असलेल्या विवाह पद्धतीमध्ये एक नवीन शब्द शिरू पाहतोय तो म्हणजे ‘सोलोगॅमी’ अर्थात जगाच्या नकाशावर हा शब्द काही नवीन नाही. फक्तभारतीय संस्कृतीमध्ये होणारा हा एकप्रकारचा असा विवाह असेल की, ज्यामध्ये विवाहाशी संबंधित सर्व विधी उत्तम प्रकारे पार पाडल्या जातील; पण फरक असा असेल की, ती व्यक्ती दुसर्‍या कोणाच्या ऐवजी स्वतःशी लग्न करेल म्हणूनच याला स्वविवाह – सोलोगॅमी म्हणतात.

डेश्रे म्हणजे एकट्यानेच करावयाची गोष्ट! आणि हा शब्द सध्या चर्चेत आलाय तो गुजरातच्या एका तरुणीच्या निर्धाराने! यावर समाज माध्यमातून लेखन होत आहे, चर्चा होत आहे, टीका होत आहे, त्याची खिल्ली उडवली जात आहे आणि विरोध सुद्धा होत आहे. कदाचित पुढच्या काही महिन्यांतच हा विषय मागे पडेल… तर कदाचित मार्केट इकोनॉमित डोकाऊ पाहणारा न्यू इव्हेंट ठरेल.
या विषयावर आपणही लिहिते व्हावे असे वाटले; कारण गेल्या काही वर्षांपासून समाजात रूढ असलेल्या पारंपरिक विवाह पद्धतीसमोर बरीच आव्हाने येताना दिसत आहेत. कौटुंबिक सलोख्यातून जुळलेले विवाह असो, प्रेमविवाह पद्धतीने जुळलेले विवाह असो, यामध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या विवाहांचा अभ्यास केला तर अनेक छोट्या छोट्या कारणाने विवाह टिकत नसल्याचे सत्य समोर आले.
मानवी मन, भावना, बुद्धी या सर्व निकषांवर याची कारणे ही वेगवेगळी आहे आणि ती असावी कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळेच जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेतील स्थिर सामाजिक प्रथा-परंपरेच्या विरुद्ध जाऊन रूढ होऊ पाहणारा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असेल, समलैंगिक विवाह असतील किंवा सोलोगॅमी असेल यावर चर्चा होणारच, विरोध व याच्या बाजूने बोलणारे, लिहिणारे अपेक्षित आहे. आणि भारतीय कुटुंबपद्धती टिकावी याकरिता विद्वानांनी या विषयावर बोलते व्हावे. खरे पाहिले तर अविवाहित राहणे, स्वप्रेम, स्वअस्तित्व कायम राखण्यासाठी लग्न न करणे याची अनेक उदाहरणे प्राचीन काळापासून दिसतात. अगदी काही अभ्यासक किंवा विशिष्ट धर्माचा अभ्यास करणार्‍या स्त्री – पुरुषांची उदाहरणे समोर आहे. पण त्या समकालीन सामाजिक, धार्मिक परिस्थितीला अनुसरून असे काही निर्णय झालेले आपल्याला दिसतात. आणि अशा व्यक्ती त्यांच्या निर्णयावर ठाम पण राहिलेल्या दिसतात. अगदी काही कथा, कल्पनारम्य घटनांमध्ये देवाच्या मूर्तीसोबत लग्न करणे किंवा देवाच्या नावाखाली मुली सोडणे असे बरेचसे विषय या ठिकाणी परत परत समोर येतात.
परंतु, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याचा विचार करणे पण गरजेचे आहे. मानवी मनाची जशी शारीरिक भूक आहे, तशी ती मानसिक भूकही आहे. आपल्या जोडीदारासोबत मैत्रीचे नाते असणे, एकमेकांच्या भावना जपणे, एकमेकांचा आदर करणे व एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे हेच खरे तर यशस्वी विवाहबंधनाचे कारण आहे. त्यामुळे अशा रीतीने एकमेकांना मानसिक आधार देत वैवाहिक जीवन मजेत घालविणार्‍याची संख्या निश्चितच जास्त आहे. त्यामुळे अशी छोटी छोटी आव्हाने किंवा आजच्या तरुणाईमध्ये आलेली निराशा, एककल्ली जीवन जगण्याची वाढत चाललेली उदाहरणे जरी समोर असली तरी हे क्षणिक आहे.
वास्तविक स्वप्रेम कोणाचे नसते, प्रत्येकाला स्वतःचा जीव महत्त्वाचा असतो. भारतात अशा एकल विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, परंतु व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने अशी काही उदाहरणे आपल्यासमोर येतात आणि ती भविष्यातही येत राहतील. फक्त याची परिणीती किंवा याचा अंत हा आजच्या समाज माध्यमाच्या अतिरिक्त वापरामुळे नवीन इन्व्हेंटमध्ये होऊ नये एवढेच. कारण नवरदेवाशिवाय होणार्‍या या विवाहात विवाहाशी संबंधित बँड, बाजा, बाराती सगळे असणारच अगदी हनिमून पॅकेज पण तयार आहे म्हणे… सरतेशेवटी एवढेच लिहावे वाटते की सामाजिक, मानसिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व परीने विचार केला तर अश्या स्वरूपाच्या बातम्यांचे भारतीय राजकारण्यांनी, समाजमाध्यमांनी किंवा कोणीही फार मोठे भांडवल ना करता एखादा व्यक्तीच्या मग ती स्त्री असो वा पुरुषाच्या मनात असे विचार जर आले असतील तर त्यामागची कारणे ना शोधता त्या व्यक्तीला थोडा वेळ
स्वतःसाठी व्यतित करू द्यावा. जेणेकरून त्याने घेतलेल्या निर्णयाची, यश-अपयश पचविण्याची व या मानवी देहाला असलेल्या मैत्रीच्या गरजेची, हक्काच्या सोबतची, आपल्या माणसांची, कुटुंबाची पर्यायाने समाजमान्य रीतींची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यावर मला वाटतंय फक्त वेळ हाच एक उपाय आहे.
कदाचित सतत दुसर्‍याच्या गरजांचा विचार करताना, स्वतःला काय हवं आहे? या प्रश्‍नाच्या शोधात असे निर्णय समोर येत असतील, सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळत नाही असं वाटणं या मागचे कारण असू शकते. वास्तविक सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे ही एक मानसिकता आपल्यात रुजलेली असते. म्हणून मनात नसूनही आपण अशा चर्चेत सहभागी होतो. आपली निवड बदलत जाते आणि कधी कधी आयुष्यही! आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळप्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी सोबत आहे याची जाणीव तरुणाईला करून देणे तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच विवाह संस्थेवर असणारा त्यांचा विश्‍वास वाढेल. त्यामुळे संवाद महत्त्वाचा, व्यक्त व्हा, बोलते करा.आयुष्य सुंदर आहे, पुनर्जन्मावर माझा काही विश्वास नाही तेव्हा विवाह या गोड नात्यातला आनंद घ्या आणि घेऊ द्या. परदेशातील प्रत्येक संस्कृती इथे आलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी? आणि हो अशा घटनांमुळे आपली संस्कृती धोक्यात आली आहे – येणार आहे असेही नाही…. जुनीच संकल्पना स्वतःला समजण्याची, स्वतःला वेळ देण्याची व कळपात परतण्याची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *