महाराष्ट्र

आखाती देशांतील युद्धाचे नाशिकच्या शेतकर्‍यांवर परिणाम

खा. वाजेंची केंद्र-राज्य सरकारकडे धाव; कांदा, द्राक्षाचे कंटेनर अडकले

नाशिक : प्रतिनिधी
इराण आणि इस्रायल, अमेरिका आघाडीमधील युद्धजन्य तणावाचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि कृषी निर्यातीवर होणार्‍या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
खा. वाजे यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच लोकसभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीला ई-मेल तसेच पत्राद्वारे सविस्तर निवेदन पाठवले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही स्वतंत्र पत्र लिहून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
खा. वाजे यांनी म्हटले की, आखाती देशांतील जवळपास चौदा देशांमध्ये हा संघर्ष सुरू असून आखाती देशात किमान एक कोटीहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. रोजगार, व्यवसाय आणि इतर कारणांमुळे नाशिक जिल्ह्यातीलही मोठी संख्या या देशांमध्ये कार्यरत आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे वाजे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. याचबरोबर या संघर्षाचा संभाव्य परिणाम कृषी निर्यातीवर होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. द्राक्षे, कांदा, डाळिंब, पपई, मनुका यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिक जिल्हा देशातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दर महिन्याला हजारो टन नाशवंत शेतमाल आखाती देशांकडे निर्यात होतो. मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे समुद्री मार्गांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे मोठ्या प्रमाणात कृषी माल अडकून पडल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे शेतकरी व निर्यातदारांमध्ये अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. वाजे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यामध्ये आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर सातत्याने लक्ष ठेवणे, आवश्यकतेनुसार तातडीच्या सूचना व हेल्पलाईन सुरू करणे, परिस्थिती बिघडल्यास नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची पूर्वतयारी ठेवणे तसेच कृषी निर्यात सुरळीत राहावी यासाठी शिपिंग व बंदर प्राधिकरणांशी समन्वय साधून शेतकरी व निर्यातदारांना दिलासा देणार्‍या उपाययोजना राबविणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारशी समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसारख्या कृषीप्रधान जिल्ह्याच्या दृष्टीने या परिस्थितीकडे वेळेत लक्ष वेधण्याचा प्रयत्न खासदार वाजे यांनी केल्याने या विषयाकडे राष्ट्रीय पातळीवरही गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिकचे दीडशे ते दोनशे कंटेनर

सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याठिकाणी हजार ते दीड हजार दुबईच्या दिशेने जाणारे कंटेनर अडकले आहेत. ज्यात तब्बल दीडशे ते दोनशेहून अधिक कंटेनर एकट्या नाशिक जिल्ह्यातून निर्यात होणारे कांदा, द्राक्ष, पपई आदी नाशवंत शेतमालाचे आहेत. हा माल वेळेत पोहोचला नाही तर खराब होण्याची भीती आहे. त्यातून शेतकरी व निर्यातदारांंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

आखाती देशांत अडकलेले नागरिक, विद्यार्थी, कामगार यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याशी सातत्याने संपर्कात आहे. यासह आता आपल्या शेतकरी व निर्यातदार यांच्यावरदेखील मोठं संकट ओढवलं आहे. त्याबाबत सरकारने मार्ग काढावा, अशी अपेक्षा आहे. त्याचसाठी हा पाठपुरावा सुरू आहे. – खा. राजाभाऊ वाजे, नाशिक

Impact of the Gulf War on Nashik Farmers

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

8 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago