नाशिक

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई

सिन्नर : प्रतिनिधी
शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक नाही; तरीही पहिली ते चौथीचे वर्ग सुरू असल्याचा प्रकार वावी येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’ला अखेर शिक्षण विभागाने नोटीस बजावली. 42 विद्यार्थ्यांचे वर्ग तात्काळ बंद करून त्यांचे अधिकृत शाळेत समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अनधिकृत शाळा चालविल्याबद्दल एक लाख रुपये शासकीय शास्ती का करण्यात येऊ नये, याचा खुलासा शिक्षण विभागाने मागविला आहे. तसेच वर्ग सुरूच ठेवल्यास दररोज 10 हजार रुपये शास्ती का आकारण्यात येऊ नये, याबाबतही सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठवलेल्या नोटीसद्वारे दिले आहेत.
वावीच्या नवले वस्ती रोडवरील शाळेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर केंद्रप्रमुखांनी तपासणी केली. बालवाडीचे वर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष पाहणीत बालवाडीसोबत पहिली ते चौथीचे वर्गही सुरू असल्याचे आढळले. या चार वर्गांत एकूण 42 विद्यार्थी असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांबाबत कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचेही तपासणीत नमूद आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून ही शाळा बिनबोभाट सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गलथान कारभारही समोर आला आहे. दरम्यान, संबंधित शाळा व्यवस्थापनाने मात्र कानावर हात ठेवले असून, असा कुठलाही प्रकार नसल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

42 विद्यार्थ्यांचे समायोजन
एक लाख दंडाची नोटीस
रोज 10 हजारांची शास्ती

42 विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसर्‍या शाळेत?

अनधिकृत शाळा सुरू ठेवणे हे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18(5) चे उल्लंघन असल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग तात्काळ बंद करून पालकांशी चर्चा करत विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळेत समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या 42 विद्यार्थ्यांचे प्रवेश सिन्नर शहरातील एका खासगी शाळेत दाखविण्यात आल्याचे समजते.

सात दिवसांची मुदत; पुढे फौजदारी कारवाई

नोटीसमध्ये सात दिवसांत समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे निर्देश आहेत. खुलासा समाधानकारक न ठरल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतरही अनधिकृत वर्ग सुरू राहिल्यास दररोज 10 हजार रुपये शास्ती आकारण्यासोबत फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पहिली ते चौथीचे वर्ग तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सात दिवसांत पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळेत समायोजन करावे. मुदतीनंतरही वर्ग सुरू राहिल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्यात येईल.
– राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सिन्नर

No recognition, yet classes continue!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

15 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

15 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

15 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

15 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

थरांवर थरांचा ‘जीवघेणा’ अट्टहास नकोच

गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गोपाळकाला, दहीहंडी उत्सवाच्या तयारीला गोविंदा पथके लागले आहेत, सराव सुरू झाले…

16 hours ago