– ज्योती काळे-जाधव

जगाने आईच्या मातृत्वाइतकाच
पित्याच्या बिनशर्त त्यागाला
महत्त्व दिले आहे का?
बाप म्हणजे उन्हात उभं राहून,
लेकरांना देणारी सावली,
स्वतःची स्वप्नं विसरून,
लेकरांची स्वप्नं करणारी दिवाळी
आईच्या मातृत्वाची, तिच्या मायेची आणि त्यागाची गाथा आपण नेहमीच ऐकत आलो आहोत; पण आपल्या कुटुंबासाठी निःशब्दपणे झटणार्‍या वडिलांच्या त्यागाची गाथादेखील समाजाला समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.
लहान असताना खेळून घरी आल्यावर आई आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायची, आपली विचारपूस करायची आणि मायेने जेवण भरवायची. तिच्या त्या मायेच्या ऊबेत आपले बालपण कधी सरून गेले, हे आपल्यालाही कळले नाही. पण त्याच बालपणाच्या आठवणींमध्ये बाबांचे एक वेगळेच रूप आठवले. दिवसभर कष्ट करून थकून घरी आलेले बाबा स्वतःचा थकवा लपवत आपल्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडायचे. कधी शाळेची फी भरायचे, कधी नवीन पुस्तके आणायचे, तर कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्यासाठी एखादी आवडती वस्तू घ्यायचे. तेव्हा त्यांच्या त्या त्यागाची जाणीव आपल्याला नव्हती; पण आज मागे वळून पाहताना जाणवते, आईचे प्रेम आपल्याला नेहमी दिसत होते, पण बाबांचा त्याग मात्र त्यांच्या शांततेत लपलेला होता. मग, मनात सहजच एक प्रश्न उमटतो, जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्व दिले आहे का?
वडील म्हणजे केवळ घराचा आर्थिक आधार नसतात; ते कुटुंबाच्या स्वप्नांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन चालणारे एक निःशब्द योद्धे असतात. आई आपल्या भावना व्यक्त करते, मुलांना जवळ घेते, प्रेम दाखवते; पण वडिलांचे प्रेम अनेकदा त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. काळजी घे, अभ्यास कर, वेळेवर घरी ये या छोट्या-छोट्या शब्दांमागेही त्यांच्या मनातील अथांग प्रेम दडलेले असते.
वडील स्वतःच्या इच्छा किती वेळा बाजूला ठेवतात, याची गणितं त्यांनी कधीच मांडलेली नसतात. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, घराच्या गरजांसाठी ते आयुष्यभर धावत राहतात. स्वतःला एखादी गोष्ट आवडली तरी ती न घेता, मुलांसाठी आधी घेऊ असं म्हणणारा बाप आपण किती वेळा पाहिला आहे! त्याच्या चेहर्‍यावरचा थकवा आपल्याला दिसतो; पण त्या थकव्यामागची जबाबदारी मात्र अनेकदा दिसत नाही. आई आजारी पडली तर संपूर्ण घर तिच्या तब्येतीची काळजी घेतं, पण वडील आजारी असतानाही अनेकदा ते शांतपणे आपली जबाबदारी पार पाडत राहतात. कारण त्यांच्या मनात एकच विचार असतो… माझ्यामुळे घर थांबता कामा नये. हीच तर त्यांच्या प्रेमाची वेगळी भाषा असते.
समाजाने मातृत्वाला जितक्या सहजपणे गौरविले, तितक्याच मनापासून पित्याच्या त्यागाकडे पाहिले आहे का? आईच्या मायेवर कविता लिहिल्या जातात, तिच्या त्यागाच्या कथा सांगितल्या जातात, पण वडिलांच्या कष्टांवर, त्यांच्या न बोलता सहन केलेल्या वेदनांवर, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांवर आपण किती बोलतो? कदाचित म्हणूनच वडिलांचा त्याग कमी नाही, फक्त तो व्यक्त होण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. आईचे प्रेम स्पर्शातून जाणवते, तर वडिलांचे प्रेम त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून दिसते.म्हणूनच आईला मायेची सावली म्हणताना वडिलांना संघर्षाची सावली म्हणायला विसरू नये. दोघांचे प्रेम वेगळे असले तरी त्याची किंमत समान आहे. आई जन्म देते, माया देते, तर वडील त्या जन्माला आलेल्या स्वप्नांना उभं करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करतात. आज आपण मोठे झालो आहोत. आपल्या गरजा पूर्ण करणार्‍या त्या हातांकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आली आहे. कदाचित त्या हातांवर सुरकुत्या पडल्या असतील, कष्टांच्या खुणा उमटल्या असतील, पण त्या प्रत्येक खुणेमध्ये आपल्या सुखाची कहाणी दडलेली आहे.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…
आईच्या प्रेमाची ऊब आणि वडिलांच्या त्यागाची सावली, या दोन्हीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. आईच्या मातृत्वाला सलाम करताना पित्याच्या निःशब्द त्यागालाही तितकाच मान मिळायला हवा. कारण बाप कधीच आपल्या त्यागाची जाहिरात करत नाही
तो फक्त आपल्या मुलांच्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून शांतपणे हसत राहतो.
आणि कदाचित यालाच म्हणतात… बिनशर्त पित्याचं प्रेम!
म्हणूनच आईच्या मातृत्वाला जितका मान मिळतो, तितकाच मान पित्याच्या निःशब्द त्यागालाही मिळायला हवा. कारण आईचं प्रेम दिसतं, जाणवतं, पण वडिलांचं प्रेम अनेकदा त्यांच्या कष्टांत, घामात आणि शांत त्यागात लपलेलं असतं.
बाप कधीच म्हणत नाही,
मी तुझ्यासाठी काय केलं?
तो फक्त एवढंच पाहतो
माझ्या लेकराला मी जे देऊ शकलो,
त्यात ते सुखी आहे का?
कदाचित म्हणूनच
बाप समजायला शब्द कमी पडतात,
आणि त्याचा त्याग समजायला
आयुष्य कमी पडतं!
म्हणून प्रश्न फक्त एवढाच नाही की,
जगाने पित्याच्या त्यागाला
महत्त्व दिलं आहे का?
तर आपण स्वतः आपल्या वडिलांच्या
त्यागाची किंमत कधी ओळखणार आहोत?
कारण बाप असतो म्हणून
घर फक्त उभं राहत नाही
बाप असतो म्हणून लेकरांची
स्वप्नं उभी असतात..
बापमाणूस असतो म्हणून तो दगड नसतो,
त्याच्या मनालाही ठेच लागते
फक्त तो आवाज करत नाही!
बापाच्या त्यागाला कधीच शब्द पुरत नाहीत,
आणि बापमाणसाच्या प्रेमाची किंमत कधीच शब्दात मोजता येत नाही…

A father figure

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

10 minutes ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 minutes ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

39 minutes ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

49 minutes ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

1 hour ago

थरांवर थरांचा ‘जीवघेणा’ अट्टहास नकोच

गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गोपाळकाला, दहीहंडी उत्सवाच्या तयारीला गोविंदा पथके लागले आहेत, सराव सुरू झाले…

1 hour ago