आस्वाद

का आकर्षिते ही जिंदगी?

– अनिल उदावंंत
जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं या जीवनाविषयीचं आकर्षण जराही कमी होत नाही. हा सार्वत्रिक अनुभव आहे. दुःख, अभाव, आजार, अपेक्षाभंग, अपुरी इच्छा, अपयश, विरह हे सारं आपल्या जीवनात असूनही जीवनाविषयीचं आपलं आकर्षण संपत नाही. हे असं का होत असेल? खरंतर, हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. जिंदगी अनेक प्रकारची लहान-मोठी दुःखं देते. कधीकधी जगणं असह्य होतं, अशक्य होतं. आपण अगदी नि:शब्द होतो. कधी कधी आपल्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा आपले सर्व शब्द संपतात, उत्साह संपतो. व्यक्त करण्यासारखं काहीच उरत नाही. आपलं जीवन जणू मुकं होऊन जातं आणि आपल्या जिंदगीला कोणताच स्वाद किंवा सुगंधही राहात नाही.
आपलं जीवन फुलासारखं सुगंधी असावं, ते आनंद देणारं असावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं; पण प्रत्यक्षात त्याच्या जीवनाला सुगंध असो किंवा नसो, त्याच्यातली जीवनाची ओढ मात्र कायम राहते. आयुष्य अगदी रुक्ष, नीरस आणि गंध-रुचिहीन झालं तरी जिंदगीविषयीचं आकर्षण माणसाला वाटतच राहतं. कधी आपलं आरोग्य हरवून जातं. एखाद्या चिवट वा असाध्य आजारात शरीर खिळखिळं होऊन जातं. आवश्यक तेवढ्याही शारीरिक हालचाली करता येत नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्‍या कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं. तरीही जगण्यासाठीचा आपला आटापिटा सुरूच असतो. कारण एकच… आपल्याला या जिंदगीचं आकर्षण वाटत असतं. कधी आपले खिसे पूर्ण रिकामे होऊन जातात. बँकेच्या खात्यातही काही शिल्लक राहात नाही. अगदी छोट्या-छोट्या गरजांसाठीही उधार-उसनवारी करावी लागते. कर्ज घ्यावं लागतं. आपण अशा विपन्नावस्थेत असलो की, आपल्याशी घट्ट असलेली अनेक नाती सैल होतात. काही दुरावतातही. जीवलग असणारं मैत्रदेखील परकं होऊन जातं आणि जीवनाच्या रणांगणात आपण एकटेच उरतो. या एकटेपणातून नैराश्य जन्म घेतं. आपलं जीवन पुन्हा सचेत होण्याची मुळीच खात्री वाटत नाही. तरीही आपण आपली लढाई सुरूच ठेवतो. भाग्य आपल्यावर रुसलं आहे असं वाटत असलं तरी जिंदगीविषयीचं आपलं आकर्षण मुळीच कमी होत नाही. म्हणजे आपण नुसत्या जीवनविषयक आदर्शांवर नव्हे, तर आपल्या वास्तविक आणि प्रत्यक्ष जीवनावरच खरं प्रेम करीत असतो. आदर्शाच्या दिशेनं वाटचाल करताना देव, धर्म, संस्कृती, संस्कार, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्यांचा काही ना काही दबाव आपल्यावर असतो. कधी स्वेच्छेने, तर कधी अनिच्छेने का होईना, पण आपण षड्र्िपूंंवर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो. वैराग्य, संयम आणि मोहापासून दूर राहण्याचं तत्त्वज्ञान आपल्याला मान्य असतं. तरीही जिंदगीचा मोह आपल्याला सुटता सुटत नाही. कदाचित हा मोह केवळ आपल्या इच्छांचा परिणाम नसावा. तो आपल्या जगण्याच्या मूलभूत प्रवृत्तीशी जोडलेला असावा.
माणसाला नाती हवी असतात. प्रत्येक वेळी त्याला या नात्यांची साथ-संगत हवी असते. पण प्रत्येकाच्या वाट्याला हे सारे येतेच असं नाही. अनेक माणसं स्वतःला अभागी समजून एकट्यानं आयुष्य जगत असतात. तरीही अशा एकट्याने जगणार्‍या माणसांनाही आपल्या जगण्याचं आकर्षण असतंच. जीवनाने अपेक्षित सुख दिलं नाही, तरी त्यातल्या कुणालाही आपलं जीवन सहजासहजी सोडावंसं वाटत नाही. माणसाला परिपूर्ण जीवनाची आशा असते. जीवनात दुःख नसावं असं त्याला जरूर वाटतं; पण दुःख आलं म्हणून त्याला लगेच जीवन नकोसं होत नाही. जीवनात कशाचाही अभाव नसावा असं त्याला वाटतं, पण अभाव असला म्हणून त्याची जगण्याची इच्छा संपूर्णपणे संपत नाही. कारण त्याला जीवनाचीच खरी आणि तीव्र ओढ असते. नाती सुंदर असावीत असं वाटतं, पण नाती तुटली म्हणून जीवनाशी असलेलं माणसाचं नातं तुटत नाही. शरीर निरोगी असावं असं वाटतं, पण जीवघेणा आजार झाला तरी जगण्याची आस असतेच. संपन्नता हवी असते; पण दारिद्र्य आलं म्हणून जगण्याची इच्छा संपत नाही. म्हणजेच, जगण्याची इच्छा ही जगण्याच्या गुणवत्तेपेक्षा अधिक मूलभूत असते. हा विचार महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा जीवन सुंदर असेल तरच ते जगण्यासारखं आहे असं आपण समजतो. प्रत्यक्षात मात्र माणूस अनेकदा जीवन सुंदर नसतानाही ते जगण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक संत, विचारवंत आणि शास्त्रज्ञांनी मानवी जीवन सुंदर असल्याचं सांगितलं आहे. ते खरंही आहे. पण आपण जीवनावर प्रेम करतो म्हणून त्याची ओढ लागते असं मात्र नाही. उलट आपल्याला जीवनाची ओढ असते म्हणून आपण त्यातलं सौंदर्य जागोजागी शोधत राहतो. माणूस जगू इच्छितो. कारण जिंदगी त्याला आकर्षित करते. त्याची जगण्याची ही ओढ कदाचित एक स्वयंभू नैसर्गिक शक्ती आहे. इथेच माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. विविधता, परस्परावलंबन आणि सतत होत राहणारे बदल ही निसर्गाची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे.
निसर्गाने माणसाला इतर अनेक जीवांपेक्षा वेगळ्या पातळीवर बुद्धी, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, विवेक आणि सर्जनशीलता दिली आहे. या क्षमतांच्या जोरावर माणूस निसर्गाला समजून घेण्याचा, त्याच्यातील नियम शोधण्याचा आणि अनेकदा त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आला आहे. या विशेष क्षमतांमागे निसर्गाचं काही विशेष प्रयोजन असावं. कदाचित माणसाला त्याचा पूर्ण उलगडा अद्याप झालेला नाही. आज काहीच उरलेलं नाही असं वाटत असतानाही उद्या काहीतरी बदलू शकतं, ही शक्यता माणसाला धरून ठेवते.
एखादं नातं पुन्हा जुळू शकतं, एखादा आजार आटोक्यात येऊ शकतो, एखादं अपयश पुढच्या यशाची सुरुवात ठरू शकतं, एखाद्या अंधार्‍या रात्रीनंतर सकाळ होऊ शकते. यासारख्या अनेकविध शक्यता माणसाला जगण्याच्या दिशेनं ढकलत राहतात. आपल्याला जिंदगीचं खरं आकर्षण आहे ते तिच्या परिपूर्णतेमुळं नव्हे, तर ती अपूर्ण असूनही आपल्याला पुढे जगण्याची संधी देत राहते यामुळे. म्हणूनच माणूस कितीही थकला, कितीही हरला, कितीही तुटला तरी जिंदगी त्याला पुन्हा हाक मारते अन् तो उठून पुन्हा जगू लागतो!

Why attract this life?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

5 minutes ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 minutes ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

39 minutes ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

49 minutes ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

1 hour ago

थरांवर थरांचा ‘जीवघेणा’ अट्टहास नकोच

गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गोपाळकाला, दहीहंडी उत्सवाच्या तयारीला गोविंदा पथके लागले आहेत, सराव सुरू झाले…

1 hour ago