भाजपा हा सतत निवडणुकांचा विचार करणारा पक्ष आहे. निवडणूक कोणतीही असो, ती जिंकायची कशी? हाच विचार स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत भाजपा करत असतो. भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत कोणाला घ्यायचे, कोणाला कोणते पद द्यायचे याविषयीचा निर्णय नबीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानुसार घेतला असेलच, याविषयी शंका नाही. नव्या कार्यकारिणीत सर्व समाज घटकांना व युवकांना आकर्षित करण्याच्या हेतूने स्थान दिले असले, तरी सर्वांना आकर्षित करणे हे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. बिहारमधील नेते नितीन नबीन यांना नवीन चेहरा म्हणून समोर आणण्यात आले. त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यांनी बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी ही जागा जिंकून सर्वांना धक्का दिला. त्यानंतर नबीन यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. चार राज्यांत विधानसभा निवडणुकांच्या हालचाली सुरू असताना नबीन यांनी कार्यकारिणी जाहीर करताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांत निवडणुका होणार आहेत. या पाश्वर्र्भूमीवर उत्तर प्रदेश व पंजाबमधील अनेक नेत्यांचा समावेश कार्यकारिणीत करण्यात आला आहे. जुन्या, अनुभवी नेत्यांसह तरुण नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. युवावर्गाला आकर्षित करण्याचा त्यामागचा हेतू स्पष्ट आहे. आधीच्या कार्यकारिणीतील काही नामांकित सदस्यांना वगळण्यामागेही हाच हेतू दिसतो. महाराष्ट्रातील आदिवासी नेत्या डॉ. भारती पवार यांना उपाध्यक्षपद मिळाले आहे. मनप्रीतसिंग बादल हेही उपाध्यक्ष झाले आहेत. पंजाबातील ते एक प्रमुख राजकीय नेता आहेत. पंजाबमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचा प्रमुख चेहरा असू शकतात. आम आदमी पक्षातून आलेले संदीप पाठक व काँग्रेसमधून आलेले रोहन गुप्ता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचे चिरंजीव अनिल यांना चिटणीसपद बक्षीस मिळाले आहे. तारिक मन्सूर व कुंवर बासित अली यांना स्थान देऊन उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यकारिणीत 65 सदस्य आहेत. त्यांपैकी तब्बल 51 चेहरे नवे आहेत. गेली काही वर्षे ज्यांना पक्षाने दूर ठेवले होते त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. राम माधव उपाध्यक्ष झाले आहेत, तर स्मृती इराणी यांना सरचिटणीसपद मिळाले आहे. राम माधव हे रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले नेते व प्रचारक आहेत. ते संघ व भाजपा यांच्यामधील दुवा आहेत. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इराणी काहीशा दुर्लक्षित झाल्या होत्या. त्यांना पद देणे हे केवळ त्यांचे पुनर्वसन नाही, तर प्रचाराला आक्रमक धार देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे. विरोधी नेत्यांवर विशेषतः सोनिया व राहुल गांधी यांच्यावर त्यांनी पूर्वीही आगपाखड केलेली आहे. आगामी निवडणुका हा एक भाग झाला. अलीकडे दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली युवकांनी मोठे आंदोलन केले. ते देशभर पसरले. त्यामुळे
धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपद सोडावे लागले. या आंदोलनाची पाश्वर्र्भूमी ही कार्यकारिणी जाहीर करण्यामागे आहे. भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपाच्या युवकांच्या संघटनेतील स्वदेश सिंग व हेमांग जोशी यांना स्थान देण्यामागे युवकांशी पक्षाला जोडण्याचा हेतू दिसतो. हेमांग मोर्चाचे अध्यक्ष होते. विद्यमान अध्यक्ष स्वदेश हे नबीन यांचे निकटवर्ती मानले जातात. त्याचवेळी अमित मालवीय व तेजस्वी सूर्य यांना नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. भाजपाच्या ’माहिती तंत्रज्ञान व समाजमाध्यम’ विभागाचे मालवीय प्रमुख होते. मात्र, ते ’वादग्रस्त’ ठरल्याने त्यांना हटवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या विभागाचे नाव आता केवळ ’समाजमाध्यम’ असे करण्यात आले आहे. तेजस्वी सूर्य युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. आक्रमक व कधीकधी आक्रस्ताळ्या विधानांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. मात्र, सीजेपीच्या आंदोलनाच्या काळात प्रत्युत्तर देण्यात युवा आघाडी कमी पडल्याचे वरिष्ठांचे मत झाल्याने त्यांना कार्यकारिणीतील स्थान गमवावे लागले. युवकांना खेचण्याच्या हेतूने समाजमाध्यम विभागाची फेररचना केली आहे. सुमारे बारा वर्षे मुस्लिम नेत्यांना दूर ठेवणार्या भाजपाने यावेळी दोन मुस्लिमांना स्थान दिले आहे. पक्ष सर्वसमावेशक असल्याचा आभास त्यामुळे निर्माण होतो. दक्षिणेतील राज्यांना कार्यकारिणीत कमी स्थान आहे. तेलंगणाचा एकही प्रतिनिधी त्यात नाही. पुढील लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली आहे. महिला व युवकांपर्यंत पोचण्यासाठी पक्ष ’नवा चेहरा’ घेऊन येत आहे, असा संदेश त्यातून दिला गेला आहे. भाजपाच्या नव्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी व रविवारी (22 व 23 ऑगस्ट 2026) पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित होते. शनिवारी त्यांनी प्रत्येक सदस्याची जाणीवपूर्वक भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि आपले संघटनात्मक अनुभव सांगितले आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. नव्या टीमला प्रेरणा देणे हाच त्यांच्या संवादाचा आणि उपस्थितीचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. पंतप्रधानांनी पदाधिकार्यांशी सुमारे सव्वाचार तास संवाद साधला असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीला रविवारी सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस आणि प्रभारी उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या बैठकीत पंतप्रधानांनी प्रत्येक पदाधिकार्याशी वैयक्तिकरीत्या संवाद साधला. त्यांनी संघटनमंत्री म्हणून आपले अनुभव सांगितले. त्या काळात पदाधिकारी म्हणून राहून काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या काळात त्यांनी कसे काम केले आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, याचे वर्णन केले. पंतप्रधानांनी पदाधिकार्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. बैठकीत पंतप्रधानांनी आपले अनुभव सांगितले आणि संघटनेला पुढे नेण्याच्या धोरणांवर चर्चा केली. त्यांनी प्रत्येक पदाधिकार्याची ओळख करून दिली आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनुसार, पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व 65 पदाधिकार्यांशी वैयक्तिकरीत्या संवाद साधला. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नव्या संघाला संघटना मजबूत करण्याचा आणि नव्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला. त्यांनी जनतेशी घनिष्ट संबंध निर्माण करण्याचा सल्लाही दिला. पंतप्रधानांनी तळागाळातील संघटना अधिक मजबूत करण्याच्या गरजेवरही भर दिला. सव्वाचार तासांच्या या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. तरुणांपर्यंत पोहोच वाढवण्यावर विशेष लक्ष देण्याची शिफारसही करण्यात आली. पंतप्रधानांनी अधिकार्यांसोबत भरड धान्यांपासून बनवलेले जेवणही घेतले. याशिवाय त्यांनी नितीन नबीन आणि बी. एल. संतोष यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या, ज्यात संसदीय मंडळाच्या सदस्यांच्या नावांवर चर्चा झाली. ही नावे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शनिवारच्या बैठकीत अध्यक्ष नितीन नबीन यांनी नव्या टीमला तरुणांशी सतत संपर्क वाढवण्याचे निर्देश दिले. यासाठी ’युवा संवाद’ कार्यक्रमाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष एक मोठी मोहीम सुरू करण्याची तयारी करत आहे. भाजपाचे लक्ष 14 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील तरुणांवर असेल, ज्यात ’जनरेशन झेड’ आणि ’जनरेशन अल्फा’च्या तरुणांचा समावेश आहे. सीजेपीच्या आंदोलनाचा हा परिणाम दिसत आहे.
Inspiration for the new team
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…