31 ऑक्टोबरला नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सोहळा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त 31 ऑक्टोबरला आयोजित ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि अधिकारी-पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे भेट घेऊन निमंत्रण दिले.
यावेळी राष्ट्रपतींना ध्वजारोहण सोहळ्यासह गोदा आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि कुंभमेळा टपाल तिकिटाच्या अनावरणासाठी आमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषी समृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आला. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पुरोहित संघांचे प्रतिनिधी, देवस्थानचे पदाधिकारी तसेच सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.
पंचेंद्रियांच्या अनुभवांतून कुंभमेळ्याचे दर्शन
राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रणपेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पाश्वर्र्भूमी, आध्यात्मिक माहात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, गोदावरीचे महत्त्व आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे.
भेटवस्तूंद्वारे महाराष्ट्राच्या वैभवाचे दर्शन
विशेष भेटवस्तू संचात आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सची अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यांचा समावेश आहे. येवला येथील पैठणी, नाशिकच्या काळ्या मनुका, काजू, चिवडा, निवडक मिठाई आणि सुका मेव्याच्या पदार्थांतून महाराष्ट्राची वस्त्रपरंपरा, कृषी समृद्धी आणि खाद्यसंस्कृती सादर करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि आदिवासी उद्योजकतेला चालना देण्याचा संदेश देण्यात आला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ महाकुंभ हा आपल्या देशाच्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरवशाली उत्सव आहे. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 31 ऑक्टोबर रोजी होणार्या भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देणे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. आगामी सिंहस्थ महाकुंभासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भाविकांच्या सुविधांच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. सुरक्षित कुंभ साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
-हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक
Invitation to the President for the flag-hoisting ceremony at Simhastha
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…