जरांगेंनी आंदोलन स्थगित करावे

राज्य सरकारची भूमिका; सण-उत्सवाच्या काळात शांतता हवी

छत्रपती संभाजीनगर :
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा बुधवारी (दि. 9) 12 दिवस होता. सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र, सरकारने एकही मागणी मान्य केली नसल्याचे सांगत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकराच्या वतीने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. जरांगे पाटलांच्या भाषेवरून, जसे त्यांचे समर्थक तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक असल्याचे सामंत यांनी म्हटले. सण-उत्सव आहेत, आंदोलन स्थगित करावे, असेही मंत्री सामंत यांनी म्हटले आहे. संवाद गरजेचा आहे आणि आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये, हे आम्ही संयमाने सांगतो.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, जरांगे पाटील आक्रमक आहेत, तर आम्ही सरकार आहोत, मायबाप आहोत, संयम आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्हाला संयमीच बोलावे लागेल. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवा असे आवाहन केले. आता ते आले नाही तर काय करावे, असा सवालही सामंत यांनी विचारला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने मी आणि प्रसाद लाड, आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्येप्रशासन, तथा आरक्षण समितीची बैठक घेतली. आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे काही काम केले त्यासाठी या बैठक होत्या. मराठवाड्यात 21 हजार 51 जात प्रमाणपत्र दाखले पडताळणी केली असून त्यातील 16,110 दाखले दिले आहेत. त्यामुळे, पडताळणी चुकीची होतेय हा गैरसमज आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले. तसेच, फक्त 2 हजार दाखले प्रलंबित आहेत, तेही लवकरच मिळतील. त्याचा ओबीसी समाजावर काहीही परिणाम होणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
आमच्या नेत्यांचेही समर्थक – आम्ही 4 पाऊल नाही 500 किमी पुढं आलोय, दंगल घडवणे हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही, हे पाप आम्ही करणार नाही, ते आमचं काम नाही. मनोज जरांगे यांनी हे डोक्यातून काढून टाकावे, उपोषणामुळे त्यांना चिडचिड होतेय. सरकार काळजी घेतेय तशी आंदोलकांनी ही काळजी घ्यावी. जसे जरांगे याचे समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहे ना, ते ही बोलणार ना. आमच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चिडचिड नाही, भावना आहेत. मात्र, प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे ते त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलू शकतात, असेही सामंत यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज बैठक
छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात आज (दि. 10) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक पहिल्यांदाच एकाच टेबलवर येणार आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार मिळालेल्या कुणबी नोंदी, त्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र काढताना येणार्‍या अडचणी आणि मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीनंतर जरांगे पाटील यांचे समाधान होते का आणि ते उपोषण मागे घेतात का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार्‍या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरनाईक यांना जरांगेंनी केले लक्ष्य
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर, मंत्र्यांंवर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत अपशब्द वापरल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनीही जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आम्हीदेखील रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांना लक्ष्य केले आहे. जरांगे यांनी खळबळजनक दावा करत छत्रपती संभाजीनगरात बसून यांचे दंगल घडवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांना मराठ्यांमध्ये मारामार्‍या घडवून आणायच्या आहेत, असे जरांगे म्हणाले. विखे यांनी दोन दिवसांपूर्वी जरांगे यांच्याकडे चर्चेला शिष्टमंडळ जाणार नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर जरांगे आक्रमक झाले आहेत.

Jarange should suspend the agitation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *