पावसाने दडी दिल्याने बळीराजा हवालदिल

पिके पाण्याअभावी करपू लागली; उत्पन्न घटण्याची भीती

बोलठाण : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील बोलठाणसह घाटमाथा परिसरात पावसाने दडी दिल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाने अचानक उघडीप दिल्यामुळे मका, कपाशी, बाजरी, तूर आणि सोयाबीन या प्रमुख खरीप पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवले असून, अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. परिणामी, यंदाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नांदगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
विशेषतः मका पिकासाठी सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पिकाच्या वाढीचा व भरणीचा काळ महत्त्वाचा असतानाच पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास कणसांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. कपाशी पिकालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी कपाशीची वाढ खुंटत असून, पिके कोमेजू लागली आहेत. त्याचप्रमाणे बाजरी, तूर आणि सोयाबीन पिकांनाही पुरेशा पाण्याअभावी फटका बसत आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांकडे पाहून शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदा आधीच शेतीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. त्यातच आता पावसाने पाठ फिरवल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांना सतावत आहे.

गेल्या 30 ते 40 दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने मका पीक 50 ते 60 टक्के उत्पन्न घटणार आहे. कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, मूग, तूर यांसारख्या पिकांचेही पावसाअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस आला तर काही अंशी नुकसान टळू शकते. – राजाराम जाधव, शेतकरी, गोंडेगाव

कोरडवाहू शेतीतील पिकांचे पावसाने दडी दिल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी हा आर्थिक संकटात ओढवला गेला आहे. कपाशी, मका, तूर, सोयाबीन, बाजरी ही पिके हातातून निसटत आहे.चांगली सुरुवात केलेल्या पावसाने अचानक दडी दिल्याने झालेला खर्चही वसूल होईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
-गणेश शिंदे, शेतकरी, बोलठाण

बाजारपेठेवर मंदीचे सावट

पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यास शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळता राहतो आणि त्याचा थेट फायदा बाजारपेठेला होतो. मात्र, पावसाअभावी शेतीपिके धोक्यात आल्याने खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांची दिवाळी म्हणून ओळखला जाणारा पोळा सणाला बाजारात शुकशुकाट पहावयास मिळाला. दुष्काळ परिस्थितीने बाजारपेठेतील उलाढाल अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे चित्र आहे. पावसाने लवकरच पुनरागमन केले नाही तर नांदगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *