पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे
अमिष दाखवणाऱ्या भोंदूला अटक
महाराष्ट्र अंनिसच्याप्रयत्नांना यश.
नाशिक: जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे खुर्द गावातील एका भोंदूने मुंबईतील काही कुटुंबांना मंत्र तंत्र, पूजा विधी करण्याचा बहाणा करून पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. त्यामुळे या भोंदू विरोधात अभोणा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री भोंदूसहित त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी भोंदू व इतर दोघांना या अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की मुंबईच्या बोरिवली उपनगरातील राजाराम सिताराम शेलार यांना त्यांच्या काही मित्रांनी भोंदू हिराचंद शिवाजी बर्डे बाबा याची ओळख करून दिली.तो मंत्र तंत्र पूजा विधी करून पैशाचा नोटांचा पाऊस पडतो असे सांगितले.त्यासाठी या भोंदूला अगोदर काही रक्कम द्यावी लागेल आणि त्याचे तो मंत्र तंत्र व पूजा विधी करून पैशाचा पाऊस पाडतो असेही सांगितले. त्यानुसार राजाराम शेलार व त्यांच्या इतर चार पीडित मित्रांनी सुरुवातीला प्रत्येकी एक हजार रुपये भोंदूला
दिले.या भोंदूने मंत्र तंत्र व पूजा विधी करण्याच्या पाहण्याने दोन लाख रुपये केल्याचे दाखविले. पैशाचा पाऊस पडण्याचा हा चमत्कार पाहून सगळ्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर बाबाने असे सांगितले की जर पाच जणांनी अकरा लाख रुपये दिले तर मंत्र तंत्र, पूजा विधी करून त्यांना पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडून देईल. त्याप्रमाणे भोंदूने
संबंधितांकडून वेळोवेळी रोख व ऑनलाइन पद्धतीने दहा लाख पंच्च्यानव हजार रुपये उकळले.
पूजा विधी करताना त्यांच्या हातात तांदूळ, अगरबत्ती आणि नारळ दिले व मंत्र सुरू केले. त्यानंतर नारळातून अचानक स्फोट होऊन चमत्कार घडल्याचे भासविले. आणि त्यानंतर त्याने तीन कोटी रुपयांच्या पैशांचा पाऊस पडल्याचे सांगितले आणि गोणी भर पैसे त्यांच्या हवाली केले. नोटांनी भरलेली ही गोणी घरी घेऊन जा आणि सात दिवस तिची पूजा करा. त्या अगोदर गोणी उघडू नका. नाहीतर तुमच्यावर कोप होईल, अशी भीती त्यांना दाखवली. दरम्यान पीडितांच्या काकूचे निधन झाल्यामुळे पीडितानी त्या गोणीची पूजा केली नाही.त्यामुळे ह्या गोणीतील रक्कम आता अशुद्ध झाली ती शुद्धीकरणासाठी पुन्हा पूजा करावी लागेल आणि त्यासाठी पुन्हा रक्कम द्यावी लागेल असे भोंदूने सांगितले.त्यामुळे पीडितानी पुन्हा भोंदूला काही लाख रुपये दिले. मात्र पीडितांना काही दिवसानी याबद्दल शंका निर्माण झाल्याने त्यांनी गोणी उघडून पाहिली.तेव्हा त्यांना असे आढळून आले की, गोणी मधील नोटांच्या बंडलमध्ये फक्त वरची नोट खरी होती आणि इतर नोटा ह्या लहान मुलांच्या खेळण्यांमधील खोट्या नोटा होत्या.याबाबत त्यांनी भोंदू बाबाला जाब विचारला. तेव्हा भोंदूने पीडिताना असे सांगितले की तुम्हाला कपडे काढून अमावशेच्या रात्री स्मशानात पूजा करावी लागेल. मात्र अशी पूजा करण्यास या पीडितांनी नकार दिला व त्यांनी दिलेले रक्कम परत मागितली. मात्र भोंदूने त्यांना गायब करण्याची तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने अभोणा पोलीस स्टेशन गाठले . त्यानतंर प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी भोंदू हिराचंद बर्डे यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करून अटक केली
आहे.सदर भोंदूने अशाच प्रकारे कुणाला फसविले असेल तर त्यांनी अभोणा पोलिसांशी किवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.