कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बाजार समिती कामकाज सुधारणा मोहीम
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव येथील उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव वेळेत सुरू करावे, त्याचप्रमाणे शेतकर्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आवाज उठवला आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समिती कामकाज सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सिन्नर येथील नायगाव उपबाजार कांदा मार्केटला भेट देत प्रशासनाला इशारा दिला.
नायगाव उपबाजारात कांदा लिलाव सकाळी 10 वाजता सुरू होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत लिलाव सुरू केला जात असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे.
दूरवरून ट्रॅक्टर व पिकअपमधून कांदा घेऊन येणार्या शेतकर्यांना तासन्तास उन्हात व धुळीत थांबावे लागत आहे. त्यामुळे लिलाव दररोज सकाळी बरोबर 10 वाजता सुरू करावेत, कांदा विक्रीनंतर शेतकर्यांना रक्कम तात्काळ अदा करण्याची यंत्रणा लागू करावी, बाजार आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये व उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Start onion auction on time in Naigaon sub-market; otherwise protest