‘हर गड तिरंगा’ संकल्पनेतून इतिहास, गडकिल्ले संवर्धनाचा संदेश
घोटी : प्रतिनिधी
येथील शिवप्रेमी व गिर्यारोहक संस्था कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक कोथळीगडावर (पेठचा किल्ला) भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात झाला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गडावर तिरंगा फडकावून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.
हर घर तिरंगा अभियानासोबतच ‘हर गड तिरंगा’ हा संकल्प घेऊन मंडळाच्या गिर्यारोहकांनी गडावर ध्वजारोहण केले. यावेळी स्वराज्यातील मावळ्यांचे शौर्य व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा जागर करण्यात आला. गड-किल्ले ही केवळ पर्यटनस्थळे नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या जिवंत पाऊलखुणा आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
गड-किल्ल्यांवर राष्ट्रीय सण
कळसूबाई मित्रमंडळ गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन साजरे करून ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती करत आहे. या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्यासह संजय शर्मा, किसन बिन्नर, रामदास चौधरी, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, सुधाकर तांबे, गोकुळ चव्हाण, महेंद्र आडोळे, नामदेव जोशी, भगवान तोकडे व इतर गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोथळी गडाचा ऐतिहासिक वारसा
स्वराज्याच्या काळात टेहळणी व दारुगोळा साठवणुकीसाठी कोथळीगड अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. 1684 मध्ये मुघलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला नंतर मराठे, पेशवे आणि 1817 मध्ये इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. गडावरील कोरीव गुहा, पाण्याच्या टाक्या आणि सुळक्यातील आतून कोरलेल्या पायर्या हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
Kalsubai Mitramandal’s Independence Day Celebration at Kothali Fort