गिरीश महाजनांनी संभ्रमाचा पडदा दूर केला
नाशिक : प्रतिनिधी
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पक्षाचा प्रोटोकॉल मोडल्याने सुनील केदार यांच्याकडून भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याच्या चर्चेला गेला आठवडाभर उधाण आले होते. मात्र, आपल्याला राजीनाम्याबाबत कोणताही निरोप नसल्याचे सांगत केदार यांनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली.
दुसरीकडे, भाजपचे स्थानिक नेतेही या विषयावर ताकास तूर लागू देईनात आणि कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी सदैव बाशिंग बांधून बसणारे पक्षाचे प्रवक्तेही नॉट रिचेबल झाले. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रमाचा पडदा अखेर नाशिक भाजपचे
कर्तेधर्ते मंत्री गिरीश महाजन यांनीच शुक्रवारी (दि. 27) दूर केला. केदार यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळे केदार यांच्या राजकीय भवितव्याचा चेंडू आता प्रदेश नेतृत्वाच्या कोर्टात गेला आहे.
भाजपमध्ये सत्तेची गुरुकिल्ली मानून विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा ओघ सुरू आहे. या सर्वांना पक्षात सामावून घेताना नेतृत्वाची कसरत होत असून, त्यातून पक्षांतर्गत गटही तयार झाले आहेत. नाशिक भाजपमध्येही तिकीट वाटपापासूनच अंतर्गत नाराजी आणि सुंदोपसुंदी सुरू होती. शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याविरोधातही महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपापासून नाराजी होती. या नाराजीला स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निमित्तानेवाट मिळाली. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या अवघ्या सहा जागांसाठी शेकडो इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. सहा नावांची निवड करताना पक्षनेतृत्वाला मोठी कसरत करावी लागली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा नावांना संमती दिल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाची ठरलेली कार्यपद्धती आणि संघटनात्मक प्रोटोकॉल बाजूला ठेवून केदार यांनी परस्पर यादी प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, ही यादी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आली नव्हती. त्यामुळे चव्हाण नाराज झाले. त्यांनी केदार यांना जाब विचारत राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार केदार यांनी राजीनामा दिला आणि तो प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, या घडामोडींची अधिकृत घोषणा न झाल्याने राजीनामा प्रकरणाचे गूढ कायम राहिले.
महाजन यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी सहा नावांना संमती दिली होती. मात्र, प्रत्येक नावावर सविस्तर चर्चा झाल्याने निर्णयाला वेळ लागला. आमच्याकडे एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. संघटनात्मक जबाबदार्यांचा विचार करून अध्यक्षांनी यादीला अंतिम मान्यता देणे अपेक्षित असते. त्यानंतरच ती जाहीर करायची असते. मात्र, तसे झाले नाही. अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून ही बाब बहुधा विस्मरणात गेली आणि त्यांनी थेट यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नाराज झाले. अध्यक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणीही कोणतीही यादी जाहीर करू शकत नाही. अशी आमच्याकडे पद्धतच नाही. त्यामुळे अध्यक्षांनी केदार यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा घेतलेला असला, तरी त्यावर अद्याप पुढील कारवाई झालेली नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
आधी जुन्याचा तर निर्णय होऊ द्या!
सुनील केदार यांच्या राजीनाम्यानंतर नाशिक भाजपच्या नव्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी घाईघाईने भाष्य करणे टाळले. आधी जुन्या शहराध्यक्षांच्या बाबतीत तर निर्णय होऊ द्या. त्यानंतर नव्या शहराध्यक्षाच्या नावाबाबत बोलू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Kedara’s resignation is in the state president’s pocket!
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…
पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…
विशिष्ट मक्तेदाराला लाभ देण्यासाठीचे प्रयत्न? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने 34 प्रकारची अत्याधुनिक…
विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक नाशिक : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी…
लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार ♦ डीलीमिटेशन, महिला आरक्षणाशी जोडलेल्या बहुचर्चित घटनादुरुस्ती विधेयकाला नवा…