बांधकामावरुन पडून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू
नाशिक देवयानी सोनार
एक बंगला बने न्यारा…अनेकांची स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होताना किती समस्यांना तोंड द्यावे लागते. लग्न पहावे करून घर पहावे बांधून, अशी म्हणही प्रचलित आहे. घर बांधताना अनेक मजुरांच्या हाताच्या कारागिरीने स्वप्नांचा महाल उभा राहिलेला असतो. परंतु घराचे बांधकाम करताना हातावर पोट असलेला मजूर जीवावर उदार होऊन काम करत असतो. हे काम करताना दुर्घटना घडून मजुरांच्या मृत्यूचे प्रकारही सातत्याने घडत असतात. परंतु तरीही प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी मजूर जीव धोक्यात घालत असतात. गेल्या चार महिन्यांत बांधकामाच्या साइटवरून पडल्यामुळे तब्बल तीस ते पस्तीस मजुरांनी जीव गमावला आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना सातत्याने घडत असूनही कोणत्याच प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.
दुसर्यांचा स्वप्नांचा महाल उभा करताना मजुरांना जीव धोक्यात घालून मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. त्यातून स्वतःचा संसार कोलमडून पत्नी, मुले अनाथ होतात. अशावेळी मजुरांच्या इमल्यांचा चक्काचूर होतो.
शहराचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई, पुण्यानंतर नाशिकला सर्वाधिक पसंती मिळत आहे. सेकंड होम घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकार्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वचजण नाशिकला पसंती देत आहेत. कनेक्टिव्हिटी आणि वेगाने विकसित होणार्या शहरात आता नाशिकचे नाव अग्रक्रमावर आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, शाळा, नोकरी, उद्योग-व्यवसायास पोषक हवामान या गोष्टीचा विचार घर घेताना केला जातो. नाशिकचे वातावरण अनुकूल असल्यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये घर आणि सदनिकांचे मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. स्थानिक तसेच मुंबई, पुण्याकडील बिल्डर लॉबी बांधकामांसाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर आणतात. अनेकदा बांधकामावर काम करताना योग्य खबरदारी न घेतल्याने किंवा सुविधा न दिल्याने बांधकाम मजुरांचे अपघात, मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 30 ते 35 बांधकाम मजुरांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. यापैकी काही घटनांमध्ये कामगारांचा हलगर्जीपणा तर काही घटनांमध्ये सुरक्षा साधनांसह इतर सुविधा न दिल्याने कामगारांचा मृत्यू झाले आहेत. या कामगारांमध्ये कुटुंबातील प्रमुख व्यक्ती किंवा त्या घरातील महिलेचा समावेश होता. कुटुंबातील कर्ती व्यक्ती गेल्याने मुले अनाथ होतात तर कुटुंबीयांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहतो.
बांधकाम मजुरांच्या जीवन सुरक्षेसाठी विविध योजना, कायदे आहेत. मात्र, ते केवळ कागदावरच आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कामगारांना काम करताना सुरक्षाविषयक संच, त्यांना देण्यात येणार्या सुविधांचा अभाव दिसून येत असल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. बिल्डर, ठेकेदार तसेच कामगार कल्याण विभाग या मजुरांना योजना आणि कायदेविषयक माहिती देण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.
कामगार कार्यालय मनुष्यबळाअभावी हतबल
बांधकामाच्या ठिकाणी पाहणी, भेट देण्यात मनुष्यबळाची कमी असल्यानेही अडचणी येत आहेत. कामगार उपायुक्त कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्यक्ष बांधकामावर भेट देण्याचे कामच होत नसल्याने योजना आणि कायद्यांची अमंलबजावणी करताना अडथळे येत आहेत.
बांधकाम कामगार मंडळात ठेकेदारानेे मजुरांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांना सामाजिक सुरक्षा प्राप्त होते. परंतु अनेक मजुरांची नोंदणी आजही होत नाही. ऑनलाइन पूर्तता करण्यात अडचणी आहेत. स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांत बांधकाम मजुरांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. कामगार उपायुक्त कार्यालयाने नोंदणीची प्रक्रिया सोपी करावी. पूर्णवेळ अधिकारी-कर्मचारी नेमावेत, ही आमची मागणी आहे. कॉन्ट्रॅक्टरचीही जबाबदारी आहे. मजुरांची नोंदणी बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा मंडळामध्ये करून घेण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
– राजू देसले, आयटक राज्य सचिव महाराष्ट्र
बांधकाम करीत असताना अनेकदा उभे राहण्यासाठी किंवा उंचावर काम करण्यासाठी पुरेशा सुविधा दिलेल्या नसतात. कामे वेळेत उरकण्याची घाई केली जाते. अपुरे मजूर असल्यानेही एकावेळी अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे अपघात घडतात. अपघात झाल्यानंतर किरकोळ मदत दिली जाते. परगाव, राज्यातून मजूर आणले जातात.शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने रोजंदारीची कामे शोधली जातात. आसपासच्या शहर वा राज्यांमध्ये बांधकाम मजुरांना चांगली मजुरी मिळत असल्याने आकर्षिले जातात. हातावर पोट घेऊन कुटुंबासह स्थलांतर केले जाते. मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढण्याचे काम सुरू केले जाते.
– सोमा कोतवाल
(बांधकाम मजूर)