सिन्नरला पहाटे बंगल्यात शिरला बिबट्या

वीर सावरकरनगरमध्ये थरार; संरक्षक भिंतीवरून उडी मारून काही सेकंदात बिबट्या पसार

सिन्नर : प्रतिनिधी
पहाटेची वेळ… परिसरातील नागरिक गाढ झोपेत असताना बिबट्या थेट एका बंगल्याच्या आवारात शिरला. संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत आलेल्या बिबट्याने पोर्चमध्ये असलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर झडप घातली. काही सेकंदातच पिल्लाला तोंडात पकडून त्याने पुन्हा संरक्षक भिंतीवरून उडी मारली आणि तेथून पसार झाला. सोमवारी (दि. 21) पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. यामुळे वीर सावरकरनगरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेले सोमनाथ बबन वारुंगसे वीर सावरकरनगरात राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आवारात पहाटेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला. पोर्चमध्ये असलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर झडप घालत त्याने त्याची शिकार केली. त्यानंतर पिल्लाला तोंडात पकडून बिबट्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत पसार झाला.
सकाळी कुत्र्याचे पिल्लू दिसत नसल्याने वारुंगसे कुटुंबीयांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यावेळी बिबट्या बंगल्यात शिरल्याचे आणि पिल्लाची शिकार करून घेऊन गेल्याचे समोर आले.
शहरातील भरवस्तीत बिबट्याने थेट बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वीर सावरकर नगरातील रहिवाशांनी केली आहे.

Leopard enters bungalow in Sinnar at dawn.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *