घोटेवाडीतील प्रशांत यांचे 4, राहुल यांचे 2 एकर पीक संपवले; आणखी 9 एकर सोयाबीन करपले
सिन्नर : भरत घोटेकर
पिकासाठी पावसाची वाट पाहत शेतकर्याने आभाळाकडे डोळे लावले. मात्र, पाऊस आला नाही आणि शेतातील उभे सोयाबीन पीक करपू लागले. जेमतेम लागलेल्या शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. त्यातच अळीचा प्रादुर्भाव वाढला. उत्पादनातून काढणीचा खर्चही निघणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घोटेवाडीतील प्रशांत कृष्णाजी घोटेकर आणि राहुल कृष्णाजी घोटेकर या भावांनी काळजावर दगड ठेवून सहा एकर सोयाबीनवर रोटर फिरवला.
प्रशांत घोटेकर यांचे चार एकर, तर राहुल घोटेकर यांचे दोन एकर सोयाबीन पीक होते. पेरणीपासून नांगरणी, खुरपणी, फवारणी आणि मजुरीचा खर्च करून पीक उभे केले होते. सुरुवातीला चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीनची वाढ खुंटली. फुलोरा कमी झाला आणि एका झाडाला तीन-चार शेंगा लागल्या तरी पाण्याअभावी त्यांची फुगवण झाली नाही.
पाऊस नसल्याने अळीचा प्रादुर्भावही वाढला. पीक काढणीला नेले तरी एकरी सुमारे पाच हजार रुपयांचा काढणी खर्च निघणार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आणखी पैसा खर्च करण्यापेक्षा उभे पीक नष्ट करण्याचा निर्णय दोघा भावांनी घेतला. खरीप पिकांचे नुकसान होत असताना उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत आणि पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सिन्नर तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे.
मेहनत मातीत मिसळली
शेतात उभ्या असलेल्या पिकावर रोटर फिरवताना दोघा भावांची महिन्यांची मेहनत अक्षरशः मातीत मिसळली. बियाणे, खत, औषधे आणि मजुरीवर केलेला खर्च वाया गेला. मात्र, उत्पादनाची शक्यता नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. विशेष म्हणजे, प्रशांत घोटेकर यांचे आणखी नऊ एकर सोयाबीन करपून गेले आहे. वावी मंडळात पावसाचा मोठा खंड पडल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. घोटेवाडी परिसरात जवळपास सर्वच शेतकर्यांची हीच अवस्था आहे. सोयाबीनसोबतच बाजरी, मका आणि अन्य खरीप पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसला आहे.
Rain vanishes, dreams of a soybean harvest wither; six acres of crop tilled under.