बिबटे अन् चोरट्यांची तालुक्यावर दहशत

वन विभागाची निष्क्रियता, पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र

निफाड : तालुका प्रतिनिधी
वन विभागाने गेल्या दहा वर्षांपूर्वी निफाडचा गोदाकाठ भाग बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करत बिबट्यापासून घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत गावागावांत जनजागृती केली. मात्र, बिबट्यांची संख्या कमी करण्याच्या उपाययोजना न केल्याने तालुक्याच्या सर्वच भागांत बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यात तालुक्यात भुरट्या चोरांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या दोन्ही घटनांमधून वन विभागाची निष्क्रियता आणि पोलिसांचा वचक कमी झाल्याचे सूचित करीत आहे. वाढत्या चोर्‍या आणि बिबट्यांच्या संचाराने अवघा तालुका दहशतीखाली असल्याचे दिसत आहे.

निफाड तालुक्यात गेल्या 25/30 वर्षांपासून बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने दहा वर्षांपूर्वी तालुक्याचा गोदाकाठ परिसर बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करीत शाळा- महाविद्यालये, चौक, ग्रामसभा आदींच्या माध्यमांतून जनजागृती केली होती. मात्र, बिबट्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेक बालके, विद्यार्थी, नागरिक आणि पाळीव जनावरांचा बळी गेला आहे, तर काही जखमी झाले आहेत. बिबटे चालत्या मोटारसायकलवर हल्ले करू लागले आहेत. पूर्वी उसाच्या शेतात दिसणारे बिबटे आता द्राक्षबाग, मका, गहू, घास आणि पडिक जमिनीत दिसू लागले आहेत. बिबट्याचा वावर आता गावापर्यंत येऊन पोहोचला आहे. बिबट्यांचे मानवावरील हल्ल्यांत वाढ झाल्याने बिबटे नरभक्षक बनले आहेत.
बिबटे आणि बछडे यांची संख्या वाढत असतानाच तालुक्यात भुरट्या चोर्‍यांमध्येदेखील वाढ होताना दिसत आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याची ही लक्षणे समजावीत.
मोटारसायकल चोरीपासून सुरू झालेले सत्र ट्रॅक्टर आणि आलिशान कार चोरीपर्यंत पोहोचले आहे. अगदी दिवसाही महिलांचे दागिने ओरबाडणे, पर्स हिसकावणे, मोबाइल हातोहात लांबविणे, असे प्रकार घडत आहेत. यात चोरटे सापडूनदेखील वरवर कारवाई होत असल्याने या चोरट्यांचे मनोधैर्य वाढत आहे. आता शहराचे हे लोण खेडेगावापर्यंत पोहोचले आहे. विद्युत पंपांचे स्टार्टर, केबल, पंप चोरीला जाणे, शेती उपयोगी साहित्य लंपास करणे, घरातील वस्तू लांबविणे असे प्रकार आता अल्पवयीन मुले करू लागल्याने बालगुन्हेगारी फोफावते की काय, अशी शंका घेतली जात आहे. कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई चोर्‍यामार्‍या आदींकडे वळताना दिसत आहे. वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या, तर चोरीला आळा बसू शकेल. मात्र, त्यासाठी ठोस कार्यवाहीची गरज आहे.

पोलिसांनी कठोर पावले उचवावीत

ग्रामीण भागात बिबट्याबरोबरच चोरांचीदेखील दहशत आहे. कारण कधी कुठे चोरी होईल याचा नेम नाही. भुरट्या चोरीचा सुळसुळाट अगदी थोड्याच कालावधीत खेड्यांपर्यंत येऊन पोहोचला. मात्र, हे भुरटे कोण हे पोलिसांना माहीत नाही, हे म्हणणे थोडे धाडसाचे ठरावे. पोलिस हे जनतेचे मित्र आहेत आणि रक्षकदेखील आहेत. त्यामुळे याच युक्तीला साजेशी भूमिका घेत पोलिसाना आता भुरट्या चोरांबाबत कठोर पावले उचलावी लागतील.

 

Leopards and thieves terrorize the taluka

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *