आशियाई विंडसर्फिंग स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकची सुवर्णकन्या आणि भारताची उदयोन्मुख विंडसर्फिंग स्टार वैष्णवी काजळे हिने थायलंडमध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. पटाया येथील जॉमटियन बीचवर नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘2025 टेक्नो 293 आणि टेक्नो 293 प्लस आशियाई चॅम्पियनशिप’मध्ये वैष्णवीने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण आणि कांस्यपदक पटकावून भारताचा गौरव वाढवला आहे.
थायलंडमधील पट्टाया शहरात 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान या आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आशिया खंडातील अव्वल आणि नामांकित तरुण विंडसर्फर्स सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणार्या या स्पर्धेत वैष्णवीने आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम फेरीत तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक आणि कांस्यपदक आपल्या नावावर केले.
तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत
भारतात क्रिकेट किंवा इतर खेळांच्या तुलनेत ‘विंडसर्फिंग’ हा खेळ अजूनही काहीसा दुर्मिळ आणि कमी प्रचलित आहे. अशा आव्हानात्मक आणि दुर्लक्षित क्रीडाप्रकारात करिअर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणारी वैष्णवी देशातील अनेक तरुण मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर कोणत्याही क्षेत्रात जागतिक यश मिळवता येते, हे वैष्णवीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
सलग चार वेळा नॅशनल चॅम्पियन
वैष्णवी काजळे हिने मिळवलेले हे आंतरराष्ट्रीय यश अपघाताने आलेले नाही, तर त्यामागे तिची अपार मेहनत आहे. याआधी तिने विंडसर्फिंगमध्ये सलग चार वेळा ‘राष्ट्रीय विजेतेपद’ पटकावले आहे. सध्या ती मुंबईतील ‘आर्मी याचिंग नोड’ येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली कठोर प्रशिक्षण घेत आहे. एवायएन हे भारतातील नौकानयन क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडू घडविणारे एक प्रमुख केंद्र आहे, ज्याचा वैष्णवीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.
Nashik's Vaishnavi's Garuda jump across the seven seas!