आपल्यासाठी कोणी काय केले यापेक्षा आपण कुणाला काय दिलंय किंवा कोणासाठी काय केलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आहे एका क्लासरूममधली. एका क्लासरूम- मध्ये अमित नावाचा एक मुलगा शिकत असतो. त्याच क्लासमध्ये रोहित व मोहित हे दोन सख्खे भाऊदेखील शिकत असतात. एके दिवशी अमितच्या वाढदिवसानिमित्त तो छान आवरून येतो. त्याच्या हातात घातलेले सुंदर घड्याळ सगळ्यांना खूप आवडते. जो भेटतो तो त्याला त्या घड्याळाबद्दल विचारतो. त्या घड्याळाचे कौतुक करतो.
तेव्हा अमित सगळ्यांना अभिमानाने सांगतो. हे घड्याळ मला माझ्या मोठ्या भावाने गिफ्ट (बक्षीस) म्हणून दिले आहे. हे ऐकल्यावर रोहित मोहितला म्हणतो. आपल्याला, पण असा कोणी भाऊ असता तर त्याने आपल्यालाही असं छानंसं गिफ्ट दिले असतं नाही का? तेव्हा मोहित हसून रोहितला म्हणाला. पण मला असे वाटते मी जर असा कुणाचा मोठा भाऊ असतो, तर मी माझ्या जवळच्यासाठी सर्वकाही करू शकलो असतो. ज्यात त्यांचा खरा आनंद आहे, त्या गोष्टी त्यांना मी नक्कीच दिल्या असत्या. या गोष्टीला बरीच वर्षे उलटतात. दोघेही भाऊ स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम होतात.
कायम दुसर्यांना काहीतरी चांगलं देण्याचा विचार करणारा मोहित एक मोठा माणूस बनतो. जो आपल्याबरोबरीने आपल्या जवळच्या सुखाचाही विचार करतो आणि दुसरीकडे रोहित एक सर्वसाधारण जीवन जगत असतो. यातून होणारा बोध लक्षात येतोय. कुणी आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण कोणासाठी काय करतोय, हे कायम बघा. स्वतःला कधीही हलकं लहान समजू नका. पदार्थात असणारे मीठ हे चिमटीभर असते; परंतु ते जर नसेल तर पदार्थाला चव येणार नाही. बल्ब दिसायला लहान असतो; परंतु तो जेव्हा लावला जातो तेव्हा संपूर्ण रूमभर प्रकाश पसरतो. आयुष्य जगताना कायम या उदाहरणांचा विचार करा.आणि स्वतः आपण काय करू शकतो. याचा विचार कायम मनात असू द्या आणि त्यादृष्टीने कृती करा. अशक्य काहीच नाहीये. फक्त आपण पुढाकार घेऊन करण्याची वेळ आहे, मग बघा समोर कशी परिस्थिती येते ते!
Living for someone else