उद्या पावसाचा यलो अलर्ट
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने दहाहून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. बुधवार, दि. 27 रोजी हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे लाडक्या गणरायचे आगमनही पावसातच होणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 97 टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातून 3025 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीलगतच्या परिसरासह रामकुंड परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यात 90.74 टक्के पाणीसाठा आहे.
शहरात सोमवारी (दि. 25) 2.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने बुधवारी (दि. 27) यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गणपतीचे आगमनही पावसात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांंत विजांचा कडकडाट व वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांंना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा व अहिल्यानगर जिल्ह्यांंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग
दारणा 6108, गंगापूर 3025, कश्यपी 640, वालदेवी 407, आळंदी 87, भावली 588, भाम 2093, वाघाड 767, तीसगाव 68, करंजगाव 1130, नांदूरमध्यमेश्वर 12620, वाकी 995, कडवा 1176, पालखेड 1592, पुणेगाव 450, ओझरखेड 443, मुकणे 363, गौतमी गोदावरी 575.
जिल्ह्यात 553 मि.मी. पाऊस
नाशिक जिल्ह्यात यंदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या मध्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. जून महिन्यात वेळेत मॉन्सून दाखल झाल्याने नाशिक जिल्हावासीयांचे पाणी टंचाईचे संकट दूर झाले. 1 जून ते 24 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात 553 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.