मोटारसायकल अपघातात दोन ठार, दोन जण गंभीर

हिसवळ-शास्त्रीनगर फाट्याजवळील घटना

मांडवड : प्रतिनिधी
नांदगाव- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर हिसवळ बुद्रुक शास्त्रीनगर फाट्याजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातून शेकडो टँकर, तसेच मनमाड शहरातील भारतीय खाद्य निगममधून धान्य घेऊन ट्रक जातात.
या महामार्गावर रोजच वर्दळ असते आणि छोटे-मोठे अपघात होतात. हिसवळ बुद्रुक- शास्त्रीनगर फाट्याजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दिगंबर अहिरे (वय 35, रा. जळगाव बुद्रुक) व फकीर गांगुर्डे (रा. पानेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासमवेत मधुकर सानप (रा. जळगाव बुद्रुक) व आकाश पवार (रा. पानेवाडी) हे दोघे गंभीर जखमी
झाले.
जखमींना उपचारासाठी तत्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मोटारसायकलस्वारांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शी वाटते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *