गावकर्यांमध्ये तीव्र संताप; आयुक्तांना दिले निवेदन
इंदिरानगर : वार्ताहर
पाथर्डीमध्ये विविध प्रकल्प लादले गेले. त्यातील कचरा डेपोमुळे दुर्गंधी तर पसरतेच, शिवाय डेपोमधील कचर्यातून काळे पाणी झिरपून विहिरीत, नदीत मिसळले जात असल्याने पाथर्डीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. त्यातच आता याच भागात कत्तलखाना सुरू होणार असल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येथील आरक्षण रद्द करण्याची मागणी नागरिकांनी
केली आहे.
पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पाच्या जवळ सर्व्हे नंबर 264/1 या क्षेत्रात आरक्षित जागेत कत्तलखाना आणण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. येथील आरक्षित जागेत वॉल कंपाउंडचे काम सुरू करण्यात आले आहे. ही बाब गावकर्यांच्या लक्षात आल्यानंतर पाथर्डी ग्रामस्थांनी, शेतकर्यांनी, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी त्र्यंबक कोंबडे यांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली गावकर्यांनी आयुक्तांची भेट घेत कत्तलखान्याला विरोध दर्शवला. सदर जागेवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात
आली आहे.
कत्तलखाना इकडे आणू नये, यासाठीचे निवेदन मनपा आयुक्तांना नुकतेच देण्यात आले आहे. या आरक्षित जागेवर कत्तलखाना होऊ नये यासाठी पाथर्डीकरांच्या वतीने वेळोवेळी विरोध दर्शवला असून, तशा प्रकारची मागणी असतानाही प्रशासनाने वेळोवेळी ग्रामस्थांची, शेतकर्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नागरिकांचा विरोध डावलून पालिका प्रशासन सदर कत्तलखाना आमच्यावर लादत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांचा विरोध डावलून अनेक प्रकल्प या ठिकाणी लादले असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. त्र्यंबक कोंबडे, मंगेश धोंगडे, सोपान जाचक, विक्रम जाचक, किरण भालेकर, गणेश बोराडे, राहुल बोराडे, संदीप चुंबळे, धनंजय ढेमसे, नितीन ढेमसे, सचिन धोंगडे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, निवेदन देताना सहभागी झाले होते. कचरा डेपो या ठिकाणी होऊ नये यासाठी पाथर्डी पंचक्रोशीतून मोठा विरोध त्या वेळी झाला होता. खत प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन छेडले गेले होते. प्रशासनाच्या वतीने आंदोलन चिरडून काढण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता.
या आंदोलनादरम्यान एका ग्रामस्थाला गोळी लागल्याने प्राण गमावावा लागला होता. अनेक वर्षे कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांनी न्यायालयीन लढाई लढली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही आणि आज स्थानिक शेतकरी काळ्या पाण्याची शिक्षा
भोगत आहेत.
पाथर्डी गावाजवळील कब्रस्तानचा मुद्दादेखील
चर्चेत राहिला होता. आता खत प्रकल्पाच्या शेजारी जबरदस्तीने कत्तलखाना लादला जातो आहे. अशा सर्वच बाबी पाथर्डी भागातच का? असा प्रश्नही पाथर्डी गावातून विचारला जातो आहे.
पाथर्डी गावात पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकर्यांची यासंदर्भात संध्याकाळी एक बैठक होऊन कत्तलखान्यास तीव्र विरोध करण्यात आला. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीदेखील यास विरोध करावा असे मत झाले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्याने लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सगळं पाथर्डीकरांनीच का सहन करावे?
या आधी खत प्रकल्प, आता कत्तलखानाखत प्रकल्पाचे मोठे दुष्परिणाम पाथर्डी पंचक्रोशी अजूनही भोगत आहे. त्यातच कब्रस्तान व त्या लगोलग कत्तलखाना आणून पाथर्डीवर मोठा अन्याय नाशिक मनपाकडून केला जात आहे. श्रावण महिन्यात पांडवलेणीजवळ यात्रा भरते. शिवाय, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पांडवलेणी, बौद्ध स्मारकही जवळच आहे. यामुळे येथे कत्तलखाना आणू नये; अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल.
-त्र्यंबक कोंबडे, शेतकरी, पाथर्डी