नाशिक : प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त शहरात आज, दि. 11 एप्रिल रोजी काढण्यात येणार्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) यांनी अधिसूचना जारी केली आहे.
ही मिरवणूक मुंबई नाका सर्कल येथून सुरू होऊन सारडा सर्कल, दूधबाजार चौक, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, दहीपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, गाडगे महाराज पूल, मनपा शाळा क्रमांक 30 ते महात्मा फुले पुतळा या मार्गाने जाणार आहे. त्यामुळे दुपारी तीनपासून मिरवणूक संपेपर्यंत या संपूर्ण मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना (मिरवणुकीतील वाहने वगळता) प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग याप्रमाणे
द्वारकाकडून येणारी वाहने मुंबई नाका सर्कलमार्गे इंदिरानगर बोगदा, आर. डी. सर्कल, सिटी सेंटर मॉल सिग्नलमार्गे वळविण्यात येतील.
इंदिरानगर बोगद्याकडून येणारी वाहतूक मुंबई नाका सर्कलमार्गे महात्मा फुले पुतळ्याच्या मागून वडाळा नाका दिशेने वळविण्यात येईल.
सीबीएसकडून येणारी वाहने गडकरी सिग्नल, चांडक सर्कलमार्गे पुढे जातील.
मेनरोडकडे जाणारी वाहतूक नेपाळी कॉर्नर, शालिमार, सीबीएसमार्गे वळविण्यात येईल.
गाडगे महाराज पुलाकडे जाणार्या वाहनांसाठी सप्तशृृंंगीदेवी मंदिर, अमरधाम रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.
वाहतूक निर्बंधातून या वाहनांना सूट
वाहतुकीचे निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. परिस्थितीनुसार मिरवणुकीदरम्यान वाहतुकीत आणखी बदल करण्याचा अधिकार पोलिसांनी राखून ठेवला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
m. Changes in traffic routes due to Phule Jayanti procession