शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची युती होऊनही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले होते. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत मराठी माणसाला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. इतिहास, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, संगीत, कला, उद्योग, व्यवसाय, सहकार इत्यादी क्षेेत्रांत भरीव योगदान देऊन देशाचे व महाराष्ट्राचे नाव मोठे करणार्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांची नावे घेऊन त्यांनी मराठी माणसाला जागे करण्याचा विशेष प्रयत्न केला. मराठी व्यक्तिमत्त्वांना आपण विसरलो असून, आपल्याला केवळ प्रतिमांमध्ये अडकवून ठेवण्यात येत असल्याची जाणीवही त्यांनी करवून दिली. महान मराठी व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांत म्हणजेच त्यांना समजून घेतले आणि त्यांचे विचारही लक्षात घेतले, तर हा महाराष्ट्र आपण नक्कीच बदलवू, असा विश्वासही त्यांनी मराठीजनांना दिला. करमणूक, इन्स्टाग्राम, मोबाइलमध्ये आपण अडकून पडलो आहोत. सरकारविरुद्ध कोणी आवाज उठवू नये, रस्त्यावर कोणी येऊ नये म्हणून तुम्हाला अडकवून ठेवण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देताना पूर्वी लोक आवाज उठवायचे आणि रस्त्यावर उतरायचे, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांनी राजकीय टोलेबाजी कमी केली, तरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांच्या चुकांवर अचूक बोट ठेवले. महाराष्ट्रावर 9.32 लाख कोटी कर्ज असताना मुख्यमंत्री तीन ट्रिलियन अर्थव्यवस्थेची भाषा करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात तरुण आणि महिला बेपत्ता कसे होतात? असा सवाल त्यांनी केला. शहरे कोलमडली आहेत. अदानींसारख्या उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. तीनवेळा कर्जमाफी देऊनही शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. बेरोजगारी वाढत आहे, असे मुद्दे उपस्थित करीत कुठे आहे आपला महाराष्ट्र? असा सवाल त्यांनी केला. इराण हा आपला जवळचा मित्र आहे. तो देश आपल्याला तेल पुरवत आला असून, जम्मू- काश्मीरच्या प्रश्नावर आपल्याला पाठिंबा देत आला. असे असतानाही त्या देशावर हल्ले झाले, तेव्हा पंतप्रधानांनी साधा निषेधही केला नाही. याकडे त्यांनी अचूक लक्ष वेधले. नेहमीच्या शैलीत त्यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा विषय पोटतिडकीने मांडला. 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पहिला गुढीपाडवा मेळावा 19 मार्च 2006 रोजी घेतला. 20 वर्षांनी गुढीपाडवा नेमका 19 मार्च रोजी आला. या योगायोगाला त्यांनी शुभसंकेत म्हटले. महाराष्ट्रात आपली म्हणजे मनसेची सत्ता येणारच, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून पुढचा महाराष्ट्र घडविण्यासाठी त्यांनी पक्षाच्या वतीने एका वेबसाइटचा (संकेतस्थळाचा) शुभारंभ केला. सन 2006 साली घोषित केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लू-प्रिंटची आठवण काढत त्यांनी महाराष्ट्रातील माणसांसमोर एक नवीन योजना आणली. त्या योजनेला त्यांनी महाराष्ट्र नेक्स्ट अर्थात, महाराष्ट्र पुढचा हे नाव दिले. महाराष्ट्राच्या विकासासाठी या संकेतस्थळावर भेट देऊन सूचना करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. महाराष्ट्राच्या विकासाचे 27 मुद्दे त्यांनी संकेतस्थळावर दिले असून, त्यावर त्यांनी सूचना मागविल्या. सर्व सूचना तज्ज्ञांकडे पाठविल्या जातील, असे सांगताना त्यांनी सूचना करणार्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर या गोष्टी संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय सरकारकडे पाठविल्या जाणार नाहीत, याची हमी दिली. लोकांनी केलेल्या सूचना तज्ज्ञांकडून तपासल्या जातील आणि त्या सूचना सरकारकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढच्या महाराष्ट्राच्या विकासात लोकांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा हा एक चांगला प्रयत्न आहे. अर्थात, सरकारची मदत घेतल्याशिवाय आणि सरकारला सहकार्य केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘विकसित भारत’चे स्वप्न दाखविले आहे. भाजपाकडून प्रत्येक राज्यात याच स्वप्नाची कॉपी केली जात आहे.’विकसित महाराष्ट्र’ हेच स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत. राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र पुढचा’ ही संकल्पना मांडली आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि देशाला योगदान देणार्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी मराठी माणसांना केले; परंतु कोणाकडेही जातीच्या दृष्टिकोनातून पाहू नये, ही त्यांची सूचना पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी आहे. 2006 ची महाराष्ट्र विकासाची ब्लू-प्रिंट आता मागे पडली आहे, हे त्यांनीही मान्य केले. त्याऐवजी त्यांनी लोकसहभागासाठी वेबसाइट उघडली आहे. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, यावर ‘महाराष्ट्र पुढचा’चे भवितव्य ठरेल. ‘विकसित महाराष्ट्र’चे स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या महायुतीने विशेषतः भाजपाने विरोधकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या विकासाची तळमळ आहे म्हणून त्यांच्यामार्फत येणार्या लोकांच्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. लोकसहभागातून विकास करायचा असेल, तर कोणत्याही माध्यमातून आलेल्या सूचनांचा विचार सरकारने करणे अत्यावश्यक ठरते. राज ठाकरे यांनी मराठी माणसांना सावध केले. त्यांच्या हिताच्या गोष्टी करून वेबसाइटच्या माध्यमातून सरकारला सहकार्य करण्याची घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे.
Maharashtra is next