थकबाकीविरोधात महापालिका आक्रमक

आणखी सोळाशे मिळकतदारांना जप्तीचे वॉरंट
थकबाकीचा 589 कोटींचा डोंगर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने काही दिवसांपासून सहाही विभागांतील चौदाशे बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट धाडले होते. त्यानंतर प्रशासनाने अधिक आक्रमक होत आणखी सोळाशे जणांना जप्ती वॉरंट बजावणार आहे. कर विभाग त्यानुसार सहाही विभागांतील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करत आहेत. दरम्यान, जप्ती वॉरंटची संख्या तीन हजारांच्या घरात जाणार आहे. 21 दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर कारवाई केली जाणार आहे.
मिळकतदारांनी 2025-26 या आर्थिक वर्षात चालू मागणीसह मागील थकबाकी अशी एकूण 275 कोटींचा भरणा केला. यात 135 कोटी जुनी थकबाकी, तर 92 कोटी चालू मागणीतील भरले आहे. दरम्यान, महापालिकेवर अद्याप 589 कोटींचा बोजा थकबाकीच्या रकमेमुळे आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोेत घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा कर आहे; परंतु मिळकतदार थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवत असल्याने थकबाकीचा डोंगर दरवर्षी वाढत आहे.
प्रशासनाने थकबाकीदारांना आकर्षित करण्यासाठी अभय योजना आणत त्याद्वारे शास्तीवर थेट 95 टक्के सूट देत असते. मात्र, तरीही बडे थकबाकीदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. अखेर या थकबाकीदारांविरोधात कर विभागाने मोहीम उघडत त्यांच्या मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाईची तयारी सुरू केली आहे.

विभागानुसार वसूल झालेली रक्कम
सातपूर –           33 कोटी 92 लाख 78 हजार 353 – 81 हजार 910
ना.पश्चिम –     43 कोटी 19 लाख 24 हजार 828- 46 हजार 311
ना.पूर्व –           48 कोटी 26 लाख 9 हजार 248- 1 लाख 2498
पंचवटी  –         56 कोटी 92 लाख 38 हजार 401- 1 लाख 51 हजार 608
सिडको  –        58 कोटी 36 लाख 93 हजार 336- 1 लाख 49 हजार 969
नाशिकरोड –   35 कोटी 1 लाख 74 हजार 756 – 91 हजार 660
एकूण –          275 कोटी 69 लाख 18 हजार 973

आतापर्यंत 275 कोटी 69 लाखांचा कर भरला आहे. थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम भरून महापालिकेला सहकार्य करावे. याकडे दुर्लक्ष करणार्‍यांना जप्तीचे वॉरंट पाठवून पुढील कारवाई केली जाईल.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा

Municipal corporation aggressive against arrears

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *