बडे थकबाकीदार रडारवर

यादी तयार करण्याचे निर्देश; विभागीय अधिकार्‍यांना पत्र

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील थकबाकीचा आकडा नऊशे कोटींच्या घरात गेला असून, शास्तीचा आकडा 480 कोटींच्या घरात गेला आहे. शहरात सहा लाख 25 हजार मिळकतदारांपैकी केवळ तीन लाख 25 हजार मिळकतदारांनीच घरपट्टीची रक्कम भरली आहे. तर तब्बल तीन लाख मिळकतदारांकडे उर्वरित थकबाकी असल्याने ती वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, महापालिकेच्या कर विभागाकडून शहरातील टॉप थकबाकीदारांची यादी तयार करणार असून, याबाबत सहाही विभागांतील विभागीय अधिकार्‍यांना पत्र पाठवले जाणार आहे.
कर विभागातून मिळणार्‍या महसुलातून शहरातील विकासकामे केली जातात. त्यामुळे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत करातून मिळणारी रक्कम आहे. यंदा कर विभागाला महापालिका आयुक्तांनी साडेतीनशे कोटी वसुलीचे टार्गेट दिले आहे. मात्र, त्याचबरोबरच वर्षानुवर्षे थकबाकीची रक्कम वसुलीसाठीचेही काम देण्यात आले आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच कर विभागातील कर्मचार्‍यांच्या खांद्यावर जणगणना व त्यानंतर मतदार पुनरीक्षण (एसआयाआर)च्याकामाचा भार टाकण्यात आला. परिणामी, याचा करवसुलीस फटका बसला आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रशासनाकडून तीन ते आठ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पुढे सप्टेंबरमध्ये अभय योजनेद्वारे शास्तीवर सूट दिली जाते. यंदा अभय योजना देण्यास प्रशासनाने ना हरकत घेतल्याने थकबाकीचा फुगवटा आणखी वाढणार आहे. दरम्यान, आता प्रशासन बड्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळवणार असून, प्रत्येक विभागातील यादी तयार केली जाणार आहे. संबंधितांना थकबाकी भरण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार असून, दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई केली
जाणार आहे.

थकबाकीदारांनी सहकार्य करावे. शहरातील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे निर्देश विभागीय अधिकार्‍यांना दिले जाणार आहेत. थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – नितीन पवार, उपायुक्त, कर विभाग, मनपा

 

Major defaulters on the radar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *