दिंडोरी : प्रतिनिधी
विवाहेच्छू तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका 24 वर्षीय शेतकरी युवकाचा नाशिक जिल्ह्यातील वणी येथील मंदिरात एका विवाहित महिलेशी खोटे लग्न लावून तब्बल तीन लाखांंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूरच्या मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मुख्य संशयित महिलेला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल जयवंत धावणे (वय 24, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा तरुण वधूच्या शोधात होता. यादरम्यान तो सोलापूरमधील एका एजंटच्या संपर्कात आला. त्या एजंटने नाशिकच्या एजंटशी संपर्क साधून विशालसाठी मुलगी ठरवली. संबंधित महिला आधीच विवाहित आणि तीन मुलांची आई असतानाही ती अविवाहित असल्याचे भासवून नऊ जणांच्या टोळीने विशालच्या फसवणुकीचा कट रचला. 7 जून 2026 रोजी दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एका मंदिरात हा विवाह पार पडला. या व्यवहारापोटी विशालकडून एका संशयित एजंटला पन्नास हजार रुपये आणि वधूच्या कथित वडिलांना दोन लाख 50 हजार रुपये, असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज उकळण्यात आला.
विवाह सोहळा आटोपल्यानंतर विशाल, नवरी मुलगी आणि इतर लोक एका वाहनाने निघाले होते. वाटेत वाहन थांबले असता एका संशयिताने वधूला खाली उतरण्यास सांगितले आणि त्यानंतर ती अचानक लपून बसली. संशय आल्याने विशाल आणि त्याच्यासोबतच्या साक्षीदारांनी चौकशी केली असता, सदर महिलेचे आधीच लग्न झालेले असून, तिला तीन मुले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विशाल साक्षीदारांसह निघून गेला. मात्र, एका विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला. विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधील दोन अनोळखी पुरुष. या टोळीने अशाच प्रकारे आणखी काहींना फसविल्याची दाट शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. नागरिकांनी विवाह जुळवताना वधू किंवा वराची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी पूर्णपणे तपासूनच निर्णय घ्यावा, जेणेकरून अशा फसवणुकीला बळी पडणार नाही, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.
Man swindled of ₹3 lakh after marrying a woman who was already married.