माजी खासदार भुजबळ : अंदरसूल, पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव
येवला : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त अंदरसूल आणि पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख
उपस्थितीत उत्साहात झाला.
याप्रसंगी भुजबळ यांनी जाहीर केले की, येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्या 57 हजार 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
एकही विद्यार्थी शिक्षणा-पासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सोनेरी काळ असतो. आज आपण ज्या स्थानावर आहोत आणि जे यश प्राप्त केले आहे, त्यामागे आपल्या शाळेचे व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे माजी खासदार भुजबळ यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. मुलांच्या आयुष्यात शिक्षण ही
सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे
सांगत, समीर भुजबळ यांनी अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळेला स्वतःच्या वतीने पाच संगणक भेट दिले. तसेच आगामी काळात परिसरातील विकासकामे, शाळांच्या अतिरिक्त वर्गखोल्या आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस दिलीप खैरे, राधाकिसन सोनवणे, वसंतराव पवार, युवानेते मकरंद सोनवणे, किसनराव धनगे, लताबाई जानराव, झुंजार देशमुख, महेश देशमुख, योगेश जागीरदार, सुनील देशमुख, दत्ता निकम, अण्णासाहेब ढाले, दादाजी देशमुख, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, मुख्याध्यापक संतोष कुमावत, मुख्याध्यापक बाळासाहेब वीरगळ आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
57,500 students to receive school supplies.