नाशिक – प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक सचिन शिंदे सातारा येथील परिवर्तन संस्थेच्या “मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीचे” पहिले मानकरी ठरले आहेत.
‘मानसरंग’ संकल्पक आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे , मनोविकार तज्ञ डॉ हमीद दाभोलकर आणि आरोग्य संवादक राजू इनामदार यांनी पुणे येथे काल पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे ( नाशिक) यांच्या सोबतच अभिजीत झुंजारराव (कल्याण आणि क्षितीज दाते (पुणे) यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
पत्रकार परिषदे मध्ये बोलताना अतुल पेठे म्हणाले कि, ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ‘मानसरंग’ नावाचा मंच चालवला जातो. ह्या ‘मानसरंग’ मंचाचा एक कार्यक्रम म्हणून या वर्षी पासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तीनही दिग्दर्शक आजच्या रंगभूमीवर कार्यरत असून ह्या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्याच्या विषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. त्याकरता त्यांना प्रत्येकी ₹५०,०००/- (पन्नास हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत बसवण्यात आलेल्या तीनही नाटकांचा ‘मानसरंग’ नाट्य-महोत्सव हा पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवशी पुणे येथील ‘द बॉक्स’ ह्या रंगमंचावर केला जाणार आहे. या उपक्रमात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहन आगाशे, नाटककार आणि समीक्षक डॉ.राजीव नाईक, लेखिका डॉ.अंजली जोशी आणि नाटककार डॉ.चंद्रशेखर फणसळकर मार्गदर्शक म्हणून सहभागी असणार आहेत.
सचिन शिंदे हे नाशिक येथे गेली दीड दशके ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ ह्या त्यांच्या नाट्य संस्थेमार्फत कार्यरत आहेत. नाशिकमध्ये बालनाट्यांच्या माध्यमातून सुरू झालेली कारकीर्द १९९० नंतर अतुल पेठे यांच्या प्रयोग परिवारपर्यंत सचिन शिंदेंना घेऊन गेली आणि प्रायोगिक, वैचारिक, वैश्विक नाट्यचळवळीचं एक नवं दालन सचिनला मिळालं. सुरूवातीला अभिनेता म्हणून सचिननं यकृत, हृदय, ऐसपैस सोयीने बैस, शीतयुद्ध सदानंद यासारख्या अनेक नाटकातून अभिनय केला. प्रेमाची गोष्ट? या नाटकाच्या तंत्रज्ञ टीममध्येही अनेक कामं त्यानं सांभाळली. पुढे दिग्दर्शक म्हणून अनेक नाटकं व एकांकिका त्यानं बसवल्या. प्रामुख्याने हंडाभर चांदण्या, गढीवरच्या पोरी, मून विदाऊट स्काय, विसर्जन, हा वास कोठून येतोय, लिअर, नेब्युला यासह अनेक महत्वाची नाटकं त्याने दिग्दर्शित केली. आजचे आघाडीचे लेखक दत्ता पाटील आणि प्राजक्त देशमुख यांची अनेक नाटकं सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केली आहेत. त्याच्या नाटकांना झी गौरव, मटा सन्मान, नाट्यपरिषद पुरस्कार, राज्यनाट्य स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळाले असून हंडाभर चांदण्या हे नाटक दिल्लीच्या भारंगम महोत्सवासह अनेक महोत्सवांचा मानकरी ठरलं आहे. सध्या सचिन शिंदे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग सांभाळत असून नाशिकमधील प्रायोगिक नाट्यचळवळ गेल्या दीड दशकात खोलवर रूजवण्यात सचिन शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
पत्रकार परिषदे मध्ये पुढे बोलताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी असे सांगितले कि, मानसिक आरोग्याचा प्रश्न हा सध्याच्या कालखंडात एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. करोना नंतरच्या कालखंडात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनदेखील आपल्या समाजात मानसिक आजारांच्या विषयी पुरेशी माहिती नाही. मानसिक आजारांकडे कलंकाच्या नजरेतून बघितले जाते. पालकत्व, पती-पत्नी मधील ताण-तणाव, कामाच्या ठिकाणचे ताण, मोबाईलचा वाढता वापर असा एक मोठा मानसिक आरोग्य आणि आजार यांचा पट आपल्या समोर आहे. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून भिडण्याचा ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ आणि नाट्य-महोत्सव हा प्रयत्न आहे. बजाज ऑटो ह्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून याला आर्थिक मदत मिळाली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. ‘मानसरंग’चे समन्वयक राजू इनामदार आणि रेश्मा कचरे ह्या वेळी उपस्थित होते
नाट्यक्षेत्रात विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवर केलेल्या कामाचं समाधान वाटतं, यामुळे आणखी १० वर्षे नाट्यक्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी खात्री आहे. हा केवळ माझा बहुमान नसून नाशिक मधील सर्व रंगकर्मींचा सन्मान आहे. नाशिककर नाट्यकर्मी व रसिक यांच्या साथीने नाशिकच नाव जगभर पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्याचीच ही पावती.
– सचिन शिंदे
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…