अग्रलेख

अफवांचा बाजार

पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असून, कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांकडून सांगितले जात असतानाही महाराष्ट्रात वाहनधारकांनी हवालदिल होऊन इंधनासाठी पेट्रोलपंपांवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून रांगा का लावल्या? पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे वाढलेले दर, इंधनाचा जपून वापर करा, प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करा, विदेश दौरे टाळा, वर्क फ्रॉम होम सुरू करा, अशा काही सूचना देऊन पंतप्रधानांनी काटकसरीचे केलेले आवाहन इत्यादी कारणे रांगा लागण्यामागे आहेत. त्यातच अफवांचा बाजार तेजीत असेल तर लोक हवालदिल होतात. इंधन संपणार, पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशा अफवा असतील तर लोक घाबरून जाणारच. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलेले एक विधानही अफवांना कारणीभूत ठरल्याचे म्हणता येते. “राज्यात सध्या महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे,” असे विधान भुजबळ यांनी केले होते. वेगवान तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी अफवा रॉकेटच्या गतीपेक्षाही अधिक गतीने पसरते. टीआरपीसाठी वृत्तवाहिन्या कोणतीही बातमी अतिरंजित करून देतात, तर सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी सक्रिय असणार्‍या उत्साही वापरकर्त्यांना काहीतरी व्हायरल करण्यासाठी केवळ निमित्त हवे असते. त्यामुळेच अफवांचे भरघोस पीक येत असते. एखादी छोटी बातमी मोठी करून सांगण्याचा वृत्तवाहिन्यांचा धंदा झाला आहे, तर सोशल मीडियात ‘ध’चा मा करायला केवळ निमित्त हवे असते. इराण युद्ध सुरू झाल्यापासून इंधनाची टंचाई निर्माण होणे अपेक्षित होते. ज्या सामुद्रधुनीतून जगाला एकूण पुरवठ्यापैकी एक चतुर्थांश किंवा एक पंचमांश इंधन पुरवठा केला जातो, ती हॉर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने इंधनटंचाई निर्माण होणे अपेक्षित होते. साधारण दोन महिन्यांपूर्वी घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी गॅस एजन्सींवर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. इतकेच नव्हे तर सिलिंडरचा काळाबाजारही होत होता. हे सारे प्रकार इराण युद्ध आणि अफवांमुळे घडले होते. त्या वेळी पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत नव्हता. वाहनधारकांनी पेट्रोलपंपांवर रांगाही लावल्या नव्हत्या. गेल्या दोन-तीन दिवसांत रांगा लागल्या, काही पंपांवर साठा शिल्लक नसल्याचे फलकही लावण्यात आले होते आणि पेट्रोल व डिझेल देण्यावर मर्यादाही घालण्यात आली होती. महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रामुख्याने वाशिम, बुलढाणा, धाराशिव (उस्मानाबाद), बीड, जळगाव आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पेट्रोल-डिझेल मिळणार नाही असे कोणी म्हटले तर वाहनधारक चिंताग्रस्त होतात. एखादी वस्तू उद्या मिळणार नाही म्हणून लोक त्या वस्तूचा साठा करण्यासाठी धावाधाव करून ती वस्तू गरज नसतानाही खरेदी करतात. परिणामी, त्या वस्तूची टंचाई निर्माण होत असते आणि काळाबाजारही होत असतो. पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली, मात्र काळाबाजार झाला नाही. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागात पेट्रोल-डिझेलसाठी ग्राहकांना धावाधाव करावी लागली, ही वस्तुस्थिती मुख्य प्रवाहातील मीडियाबरोबरच सोशल मीडियाने टिपली. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप सलग पाच-सहा दिवसांपासून बंद होते. डिझेल मिळवण्यासाठी लागलेल्या लांब रांगांमध्ये नागरिकांमध्ये वाद होऊन हिंसक हाणामारीच्या घटनाही समोर आल्या. बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड तुटवड्यामुळे वाहनधारकांना इंधनासाठी रात्रीपासून बारा-बारा तास रांगेत उभे राहावे लागले. मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दिवसांपासून इंधनाचा भीषण तुटवडा जाणवत असून, बहुतांश पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही इंधनासाठी रांगा लागल्या. नाशिक जिल्हा व शहरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. मुंबईतील कुर्ला व इतर काही भागांतील पेट्रोलपंपांवर रात्रीच्या वेळी अचानक मोठ्या रांगा लागल्या होत्या. पेट्रोल संपणार, अशा अफवांमुळे नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करून घाबरून खरेदी केल्याने ही तात्पुरती टंचाई निर्माण झाली होती, असे पेट्रोल डीलर्स संघटनेने म्हटले. युद्ध सुरू झाल्यापासून आपल्याकडे इंधनाचा भरपूर साठा आहे, काळजी करण्याचे कारण नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले. युद्धानंतर लगेच टंचाई जाणवली नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. युद्ध सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत; परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून, युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहेत आणि भविष्यात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहेच. युद्ध थांबण्याची किंवा दीर्घकालीन युद्धविराम होण्याची चिन्हे नाहीत. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन वाहतूक करण्यास इराणने भारताला परवानगी दिलेली असून, रशियाकडून तेल घेण्याची मुभा अमेरिकेने भारताला दिली आहे. या गोष्टी सकारात्मक असल्या तरी इंधनाची आयात करण्यासाठी आपल्याकडे डॉलर असणे आवश्यक आहे. डॉलरची बचत करण्यासाठीच पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले तरी मीडिया आणि सोशल मीडियाकडून मिळणार्‍या माहितीचे वेगवेगळे अर्थ लोक काढतात आणि त्यातून कानोकानी अफवा जन्म घेतात. भारताकडे इंधनाचा भरपूर साठा आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम विभागाच्या सचिव सुजाता शर्मा वेळोवेळी सांगत आल्या आहेत. महाराष्ट्रात इंधनाची टंचाई नाही किंवा पुरेसा साठा असून, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कठीण परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला इंधन आयात करावे लागते, तेही आखाती देशांतून; तेथे युद्ध सुरू असेल तर पुरवठ्यात व्यत्यय येणार हे स्पष्ट आहे. वेगवेगळ्या मार्गांनी इंधन आणण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. युद्धामुळे कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे हे सर्वसामान्य लोकांना सहजच समजते. त्यात उलटसुलट चर्चेतून अफवा जन्म घेतात. पण कधीकधी तशी वस्तुस्थितीही असतेच. महाराष्ट्रासह भारतात इंधनटंचाई आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अफवांचे पीक आले आहे, हेही नाकारता येत नाही.

Market of rumours

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago