तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्राबल्य असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाची देशभर चर्चा होत असते. भाजपाला कडवा विरोध असलेल्या या पक्षाचे काँग्रेसशी आता सूत जमत नाही, विरोधकांच्या इंडिया आघाडीत त्यांचा समावेश नाही. निवडणुकांत हा पक्ष स्वबळावर उतरण्याची जेव्हा तयारी करतो, तेव्हा विरोधकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुस्लिम मतदार हाच या पक्षाचा जनाधार असल्याने विरोधी पक्षांच्या मुस्लिम मतांवर हा पक्ष परिणाम करतो, असे बोलले जाते. या पक्षाची भूमिका सतत बदलणारी असते. एआयएमआयएमला देशभरात आपली ताकद वाढवून मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव पक्ष म्हणून ओळख निर्माण करायची आहे. तेलंगणात विशेषतः हैदराबादेत या पक्षाची तशी ओळख आहे. केवळ मुस्लिम मतांवर ताकद वाढविता येत नाही, हे लक्षात घेऊन ओवैसी यांचा प्रयत्न नवीन मित्र शोधण्यात असतो. तेलंगणात एआयएमआयएमने कोणत्याही मोठ्या पक्षांशी युती करून एकत्र निवडणुका लढवलेलेल्या नाहीत. 2008 ते 2012 या काळात केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारला आणि संयुक्त आंध्र प्रदेशातील काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता; परंतु 2009 च्या निवडणुका स्वतंत्रच लढवल्या होत्या. नोव्हेंबर 2012 मध्ये हैदराबादच्या चारमिनारजवळील भाग्यलक्ष्मी मंदिराच्या अनधिकृत विस्ताराविरुद्ध निदर्शने करणार्या आमदारांना काँग्रेस सरकारने अटक केल्याने त्यांनी हा पाठिंबा काढून घेतला. पुढे 2014 मध्ये तेलंगणा निर्मितीनंतर 2023 पर्यंत के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती टीआरएस (आता भारत राष्ट्र समिती) या पक्षासोबत जवळीक राहिली. या काळात विधानसभा व लोकसभा निवडणुकांत हैदराबादमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले होते, तरी उर्वरित तेलंगणात ओवैसींनी भारत राष्ट्र समितीला पाठिंबा दिला होता. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी एकत्र सत्तेत सहभाग घेतला. 2023 मध्ये सत्ता बदलल्यानंतर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला. तेलंगणाबाहेर पक्षविस्तारासाठी ओवैसींनी लहान पक्षांशी युतीचे प्रयोग केले. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत (2019 लोकसभा), बिहारमध्ये बहुजन समाज पक्ष व रालोक समता पक्षासोबत (2020 विधानसभा), तर उत्तर प्रदेशात जन अधिकार पक्ष (2022) आणि अपना दल कमेरावादीसोबत (2024) अधिकृत युती करून निवडणुका लढवल्या; परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्रात वंचितशी युती करून 2019 साली औरंगाबादची (आता छत्रपती संभाजीनगर) जागा जिंकली होती. नंतर ही युती 2019 च्याच विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून तुटली. तेव्हापासून ओवैसी नव्या मित्राच्या शोधात होते. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला आव्हान देणारे, चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीशी (कांशीराम) एआयएमआयएमने युती केली आहे. दोन्ही पक्षांनी मिळून ‘समाज परिवर्तन मोर्चा’ असे युतीचे नामकरण केले आहे. भाजपविरोधात मोर्चा स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला. हा परिवर्तन मोर्चा मायावती यांच्या दलित मतांवर आणि समाजवादी पक्षाच्या मुस्लिम मतांवर डोळा ठेवून आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पिछडा, दलित व अल्पसंख्याक म्हणजे पी. डी.ए. असे नवीन समीकरण मांडले आहे. परिवर्तन मोर्चा दलित व मुस्लिम मतांवर अवलंबून राहणार आहे. याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, असे वरकरणी दिसत आहे. समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे घोडे अडले आहे. दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत असून, शेवटच्या क्षणी त्यांची युती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षापासून मुस्लिम मते तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मुस्लिमांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व न देता किंवा घटनात्मक मूल्यांचे रक्षण न करता अखिलेश यादव केवळ त्यांची मते मिळवू पाहतात, असा आरोप ओवैसी यांनी केला. अखिलेश यादव हे राममंदिरात जाणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओवैसी यांनी चंद्रशेखर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असताना बिहारमधील दलित नेते चिराग पासवान यांनी उत्तर प्रदेशात लक्ष घातले आहे. पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष बिहारमध्ये दलितांचा पक्ष आहे. हा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा आघाडीत या पक्षाचा समावेश नसला, तरी विरोधकांकडे जाणणार्या मतदारांची दिशाभूल करण्याचा आणि इंडिया आघाडीत कुरबुरी वाढविण्याचा प्रयत्न पासवान यांचा असल्याचे दिसते. समाजवादी पक्ष काँग्रेसला अपमानित करत असल्याची टिप्पणी चिराग पासवान यांनी केली. समाजवादी पक्षाने पाच उमेदवारांची यादी घोषित केल्यानंतर वाद उपस्थित झाला. सहारनपूर लोकसभा मतदारसंघात असणार्या बेहट विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने उमर अली खान यांना उमेदवारी दिली. सहारनपूरमध्ये काँग्रेसचे इम्रान मसूद खासदार आहे. काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा जागांवर दावा केला असताना समाजवादी पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा तापत असताना पासवान यांनी काँग्रेसचा अपमान होत असल्याची टीका केली. पासवान यांचा पक्ष उत्तर प्रदेशात सर्व 403 जागा लढवण्याची तयारी करत आहे. उत्तर प्रदेशात दलित मतदार वाटा सुमारे 21 टक्के आहे. मुस्लिम मतदार सुमारे 19.5 टक्के आहेत. दोन्ही समुदायाचे प्रमाण सुमारे 40 टक्के आहे. यातील मुस्लिमांवर समाजवादी पक्षाचा भरवसा आहे. त्याकडे ओवैसी यांची नजर आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला दलित मतांचा आधार असून, त्यांवर चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीची नजर गेली आहे. ओवैसी व आझाद यांनी एकत्र येऊन दोन्ही समुदायांना ‘परिवर्तन’च्या नावाने साद घातली आहे. दलित मतदारांवर भाजपाचीही नजर आहे. समाजवादी पक्षही दलितांवर लक्ष ठेवून आहे. दलित मतदारांची दिशाभूल करून त्यांना भाजपाकडे वळविण्यासाठी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा वापर केला जाण्याची शक्यता आहेच. ओवैसी यांनी आझाद यांचा हात धरून उत्तर प्रदेशात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत मते एकमेकांच्या पक्षांकडे वळली तरच युती यशस्वी ठरते. महाराष्ट्रात एआयएमआयएमची मते वंचितला मिळाली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
Change Front
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…