नाशिक

नाशिक नगरीला प्राप्त व्हावा देववाणी, वेदविद्येच्या माहेरघराचा दर्जा

संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि संशोधकांनी व्यक्त केल्या भावना

नाशिक : मुकुंद बाविस्कर
आषाढस्य प्रथम दिवसे। म्हणजे आषाढाचा प्रथम दिवस. तो महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. आज (दि.15) महाकवी कालिदास दिन. यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, नाशिकनगरी ही प्राचीन काळापासून आजपर्यंत देववाणी संस्कृत भाषा तसेच वेदविद्येचे माहेरघर मानले जाते. याठिकाणी अनेक वेदविद्येचे शिक्षण देणार्‍या पाठशाळा आहेत, साहजिकच नाशिकनगरीत पुन्हा एकदा संस्कृत भाषेला सुवर्ण दिन प्राप्त व्हावेत, अशी अपेक्षा संस्कृत भाषेच्या अभ्यासकांनी आणि मान्यवरांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठ हे संस्कृत भाषा अभ्यासाबरोबरच भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालणारे एक जागतिक दर्जाचे ज्ञान केंद्र म्हणून विकसित होत आहे. या सोयी-सुविधांमुळे भविष्यात नाशिकनगरी संस्कृत ज्ञानाचे जागतिक केंद्र ठरू शकते.

भावकवी, महाकवी आणि राजकवी असा गौरव प्राप्त झालेले किंबहुना संस्कृत भाषेतील पंडित कविकुलगुरू अशी पदवी प्राप्त असलेले कवी कालिदास म्हणजे भारतीय साहित्याचा मानबिंदू होय. केवळ काव्यच नव्हे, तर नाटककार, इतिहासकार आणि श्रुती, स्मृती, पुराणासह अनेक शास्त्रांंचे अभ्यासक व कलांचे जाणकार असलेल्या कालिदासांनी रघुवंश, कुमारसंभव, ऋतुसंहार ही महाकाव्ये लिहिली. तद्वतच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिजात शाकुंतल ही नाटके लिहिली. कालिदासांचे मेघदूत म्हणजे प्रतिभेचा कल्पनाविलास आणि भाषेचा मुक्तविलास. भावभावनांचा कल्लोळ, निसर्गाचे मनमोहक लेणे, आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या मेघाला उद्देशून मेघदूत लिहिले आणि तेव्हापासूनच आषाढस्य प्रथम दिवसे। हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आषाढाचा हा पहिला दिवस कसा येतो? आणि त्याची मौज नेमकी काय? याचे मनोहारी वर्णन महाकवींनी केले आहे. निसर्गचक्रात नियमितता विलक्षण आहे. याचा संबंध थेट आपल्या जीवनाशी आहे. कारण भारत हा कृषिप्रधान देश असल्याने प्रामुख्याने निसर्गावर म्हणजेच पावसाच्या पाण्यावर येथील शेतकरी आणि शेती अवलंबून आहे. भारतीय संवत्सरात महिन्यांची गणना ही चैत्र ते फाल्गुन अशी आहे. महिने, तिथी, वार, ऋतु व नक्षत्र याचा परस्परसंबंध जोडलेला आहे. महाकवी कालिदासांच्या अनेक काव्यांतही त्याचा उल्लेख आढळतो.
निसर्गाचे मन वाचणारा आणि मानवी भावनांची जाण असणारा, खर्‍या अर्थाने कालिदास हा महाकवी आहे. कालिदास श्रद्धेच्या, अभ्यासरूपी तपस्येने घडविणारा हा महाकवी असून, भाषेवर जितके प्रभुत्व, भाषेत जितकी सहजता तितकेच मानवी मनाचा ठाव घेणारा आणि मानवी आणि मानवेतर भावनांचा ठाव घेणारा हा महाकवी आहे. आजच्या या यांत्रिक आणि व्यावहारिक जगात, माणसाला त्याचे माणूसपण जपायला कालिदासाचे साहित्य मार्गदर्शक ठरते. एकूणच संस्कृत भाषेचा आणि कालिदासाच्या साहित्याचा नाशिकनगरीत अभ्यास आणि संशोधन याला चालना मिळावी म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत संस्कृत भाषेच्या प्राध्यापक व अभ्यासकांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय सुरू झाले असून, संस्कृत भाषा, साहित्य, व्याकरण, ज्योतिष, वेदांत विविध शास्त्रांचे अध्यापन सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने संस्कृत ज्ञान प्राप्त करावे व आपल्या नवीन पिढीला येथे प्रवेश करून घ्यावा, असे आवाहन कालिदास दिनानिमित्ताने करीत आहे.केवळ पारंपरिक संस्कृतचे अध्यापन न करता आधुनिक काळाशी सुसंगत असे शिक्षण देण्यावर विद्यापीठाचा भर आहे. संस्कृत संवर्धनासोबतच विविध व्यावसायिक प्रशिक्षण, पीजी डिप्लोमा कोर्सेस आणि यूपीएससी परीक्षेसाठी संस्कृत माध्यमातून करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. भारतीय संस्कृतीतील प्राचीन गुरुकुल पद्धतीला आधुनिक परिप्रेक्ष्यात पुनरुज्जीवित करण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. विद्यापीठातर्फे नाशिकमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद, कुलपती संमेलन, उत्कर्ष महोत्सव आणि संत संमेलने आयोजित केली जातात. याद्वारे देशातील अग्रगण्य संस्कृत अभ्यासक आणि कुलगुरू एकत्र येऊन भावी काळातील संस्कृत संवर्धनाचा आराखडा तयार करत आहोत, अशी माहिती नाशिकच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक प्रो. निलाभ तिवारी यांनी दिली.

संस्कृत विद्यापीठात विविध अभ्यासक्रम सुरु

नाशिक येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे नवीन केंद्र (कॅम्पस) सुरू करण्यात आले आहे. याद्वारे संस्कृत भाषेच्या जतन, संवर्धन आणि संशोधनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. नाशिक कॅम्पसचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सुरू होत असलेला आयुर्वेद गुरुकुलम् हा अभिनव अभ्यासक्रम होय. आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने या विद्यापीठात बी.ए.एम.एस. हा संपूर्ण संस्कृत आधारित वैद्यकीय अभ्यासक्रम विकसित केला जात आहे. याशिवाय भाविष्यात बी.ई.,बी.टेक. यांसारखे अभ्यासक्रम संस्कृत भाषेतून सुरू करण्याचा मानस आहे.

महाकवी कालिदास हे संस्कृत साहित्यातील अत्यंत श्रेष्ठ महाकवी होऊन गेले. त्यांचे प्रसिद्ध संस्कृत साहित्य मेघदूतम या महाकाव्याची सुरवात आषाढस्य प्रथम दिवसे। या वाक्याने होत असल्याने आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात येतो. भारतीय साहित्यातील त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस भारतात साजरा करण्यात येतो. या महान कवीच्या स्मृती म्हणून नाशिकनगरीत संस्कृत अध्ययनासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्कृत भाषाप्रेमी नागरिक व संस्था तसेच शासनाने अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण प्राचीन काळापासून नाशिकनगरीत संस्कृत भाषा व वेदविद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले जात आहे.
– आचार्य वेदमूर्ती रवींद्र पैठणे, महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान

संस्कृत भाषा ही जीवनाभिमुख आहे. नाशिकमधील संस्कृतच्या अभ्यासकांनी एकत्र येऊन, विविध उपक्रम करावेत. तसे आयोजन दोन महिन्यांतून करता येईल आणि त्याद्वारे या भाषेचे प्रवाही स्वरूप, जीवनाभिमुखता आणि सर्वांना सामावून घेण्याची भूमिका आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. महाविद्यालयात कालिदास दिनानिमित्ताने, संस्कृत दिनानिमित्ताने आणि निष्कारणही विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमापासून संशोधन क्षेत्रापर्यंत अशा विविध विषयांचा समावेश केला जातो.
– प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर, संस्कृत भाषा विभाग, एचपीटी आर्टस् महाविद्यालय, नाशिक

May the city of Nashik attain the status of a hub for the divine language (Sanskrit) and Vedic learning.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago